कोल्हापूर : आंतरराज्य टोळीतील दोघे घरफोडीप्रकरणी जेरबंद; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : आंतरराज्य टोळीतील दोघे घरफोडीप्रकरणी जेरबंद; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वाहने चोरी, घरफोड्या करणार्‍या आंतरराज्य टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. ईश्वरसिंह रणवीरसिंह राजपूत (वय 30) आणि कृष्णकुमार राणाराम देवासी (27, सध्या रा. गोवा, मूळ रा. राज्यस्थान) अशी त्या संशयितांची नावे आहेत. दोघांकडून चोरीची वाहने, घरफोडीतील साहित्य असा 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चोरीची मोटार घेऊन दोन संशयित कागल रस्त्यावरील कणेरी फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या पथकाने या परिसरात सापळा रचून संशयित ईश्वरसिंह आणि कृष्णकुमार याला मोटारीसह ताब्यात घेतले. पोलिस चौकशीमध्ये या दोघांनी साथीदारांसह करवीर पोलिस ठाणे, गांधीनगर पोलिस ठाणे व आजरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व वाहनांची चोरी केल्याचे कबूल केले.

पोलिस निरीक्षक संजय गोर्ले, तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले, उपनिरीक्षक महादेव कुराडे, अजय गोडबोले, अंमलदार रणजित पाटील, प्रशांत कांबळे, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, रणजित कांबळे, विनोद कांबळे यांनी कारवाई केली.

रात्री दाखल… पहाटे पसार

संशयित चोरटे हे सध्या गोव्यात राहण्यास होते. घरफोडी, वाहन चोरी करण्यासाठी रात्री गोव्यातून बाहेर पडायचे. कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडी केली की पहाटेपर्यंत पुन्हा गोव्यात दाखल व्हायचे, अशी त्यांची गुन्ह्याची पद्धत असल्याचे तपासात पुढे आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news