कोल्हापूर : ‘लम्पी’ला आयुर्वेदिक लाडू ठरतोय रामबाण | पुढारी

कोल्हापूर : ‘लम्पी’ला आयुर्वेदिक लाडू ठरतोय रामबाण

इचलकरंजी : विठ्ठल बिरंजे : लम्पीवर आयुर्वेदिक लाडूची मात्रा प्रभावी ठरू लागली आहे. यासाठी इचलकरंजीतील गो प्रेमी तरुणांनी सेवाव्रत हाती घेतले आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लाडू तयार करून गोपालकांना मोफत देण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे लम्पीने हैराण झालेल्या बळीराजाला मोठा आधार मिळालेला आहे.

इचलकरंजी परिसरात लम्पीने थैमान घातले आहे. दुभती जनावरे डोळ्यासमोर दगावत आहेत. शहरात आतापर्यंत दहाहून अधिक गायी दगावल्या आहेत. हे सत्र सुरूच असल्याने बळीराजा उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे. याला आपण माणुसकीच्या भावनेतून मदत केली पाहिजे या उदात्त हेतूने येथील शिवराणा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गो प्रेमी तरुण पुढे आले आहेत. संस्थेचे 67 तरुण स्ववर्गणीतून आयुर्वेदीक लाडू तयार करीत आहेत.

राजस्थानातील गोशाळेचा फॉर्म्युला

बुंदी राजस्थान येथील गोशाळा चालक बंडा रामद्वारा यांनी तयार केलेला आयुर्वेदिक लाडूचा फॉर्म्युला गुणकारी ठरला असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली इचलकरंजीत ही सेवा सुरु आहे. त्यांनी दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार लाडू बनवले जात आहे. तयार लाडू बाधित जनावरांच्या मालकापर्यंत स्व खर्चाने पोहोच केले जात आहेत. या आयुर्वेदीक लाडू जनावरांना दिल्यानंतर ईम्युनिटी पॉवर वाढत असून संसर्गाचे प्रमाणीही कमी झाल्याचे संस्थेचे प्रमुख राजतिलक लाहोटी यांनी दावा केला आहे. आतपर्यंत तीन हजार लाडू वाटप केले असून सध्या लाडू तयार करण्याचे काम सुरु असून लम्पीचे समुळ उच्चाटन होईपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्याचा संस्थेचा मानस आहे.

मात्रा देण्याची पध्दत

सर्वसाधारणपणे एक लाडू 50 ग्रॅम वजनाचा असून लम्पीची लागण झालेल्या बैल, गायीस दिवसातून 3 लाडू खाण्यास देणे आवश्यक आहे.

असे तयार होतात एका वेळी 1300 लाडू

मोहरी तेल : 5 किलो
गूळ : 20 किलो
बाजरी आटा : 25 किलो
ओवा : 500 ग्रॅम
गिलोय : 2 किलो
चारोळी : 500 ग्रॅम
तुळशी अर्क : 20 मि.लि.
सैंधव मीठ : 1 किलो
सुंठ : 1 किलो
काळी मिरी : 500 ग्रॅम
हळद : 2.5 किलो
धने : 1 किलो

Back to top button