लम्पीबाधित जनावरांचा उपचार खर्च शासन करणार : राधाकृष्ण विखे-पाटील | पुढारी

लम्पीबाधित जनावरांचा उपचार खर्च शासन करणार : राधाकृष्ण विखे-पाटील

हातकणंगले, पुढारी वृत्तसेवा : राज्यात लम्पी रोगावर नियंत्रण आणण्यासाठी पशू आंतरराज्य बंदी, बाजार बंदी याबरोबरच जिल्ह्यात 93 टक्के लसीकरण केले आहे. त्यामुळे प्रादुर्भाव झालेल्या 30 जिल्ह्यांत रोग नियंत्रणात आणण्यात सरकारला यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्याला लसीकरणासाठी एक कोटी रुपये दिले असून, आणखी निधी देऊ. त्याशिवाय राज्यातील लसीकरणाचा खर्च शासनामार्फत करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी येथे केले.

लम्पीच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी मंत्री विखे-पाटील कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यांनी मौजे वडगाव, अतिग्रे, हेरले गावांना भेटी देऊन हातकणंगले तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार धैर्यशील माने यांनी तालुक्यात पशुवैद्यकांची कमतरता असल्याने जनावरांची हेळसांड होत असल्याचे सांगितले. यावेळी मंत्री पाटील यांनी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांची एक हजार रिक्त पदे भरणार असल्याचे सांगितले. आमदार राजू आवळे यांनी खासगी डॉक्टरांना काम करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. खासगी डॉक्टरांनीही मानधन तत्त्वावर लम्पीसदृश जनावरांवर उपचार करावेत. शेतकर्‍यांचे पशुधन जगले पाहिजे, असे मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.

आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार राजीव आवळे व जि.प. सदस्य अरुण इंगवले यांनी लम्पी रोग झालेल्या जनावरांसाठी स्वतंत्र निवारण केंद्र सुरू करावे, दुष्काळ स्थितीमध्ये जशा छावण्या सुरू केल्या, त्याचप्रमाणे या रोगावरही छावण्या सुरू कराव्यात, वैद्यकीय सेवेवर भर द्यावा, अशा मागण्या केल्या. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, मिरज प्रांताधिकारी समीर शिंगटे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार, कल्पना ढवळे, माजी जि.प. सदस्य अशोकराव माने, प्रसाद खोबरे आदी उपस्थित होते.

अतिग्रे प्रकरणाचे चौकशीचे आदेश

अतिग्रे येथे अनेक लम्पीसदृश जनावरांवर पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी उपचार केले आहेत. परंतु उपचार करीत असताना एकाच सुईने लस दिल्याने संसर्ग बळावला असल्याचे निदर्शनास आले आहे. याची गांभीर्याने दखल घेत तत्काळ चौकशीचे आदेश देण्यात आले.

Back to top button