केरळच्या धर्तीवर ‘कोल्हापूर ट्रॅव्हल मार्ट’ शक्य | पुढारी

केरळच्या धर्तीवर ‘कोल्हापूर ट्रॅव्हल मार्ट’ शक्य

कोल्हापूर, प्रवीण मस्के : कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. याठिकाणी ‘एमटीडीसी’ने पुढाकार घेऊन केरळ ट्रॅव्हल मार्टसारखे विभागीय कार्यालय उभारल्यास आसपासच्या जिल्ह्यातील पर्यटनाची इत्थंभूत माहिती पर्यटकांना मिळेल. शिवाय कोल्हापुरातून विमानसेवा सुरू झाली आहे. परराज्याशी कनेक्टिव्हिटी वाढविल्यास व्यावसायिक, धार्मिक पर्यटन वाढेल. तसेच कोल्हापुरात आल्यावर पर्यटकांना जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती व्हावी, यासाठी कोल्हापूरचा इतिहास, पाऊलखुणा दर्शविणारे सचित्र फलक लावावेत.

त्याचबरोबर श्री अंबाबाई मंदिर,जोतिबा, किल्ले पन्हाळगड, खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, दाजीपूर अभयारण्य, सांगलीतील गणपती मंदिर, मिरजमधील मिरासाहेब दर्गा, वाद्यनिर्मिती व्यवसाय, तासगावचा गणपती, चांदोली, सागरेश्वर अभयारण्य, हळद बाजारपेठ, सातार्‍यातील कास पठार, महाबळेश्वर, किल्ले अजिंक्यतारा, शिखर शिंगणापूर, पाचगणी, मांढरदेव तर सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मंदिर, माळढोक पक्षी अभयारण्य, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, बार्शी यासह पुणे व कोकणातील महत्त्वाच्या पर्यटन ठिकाणी माहिती ट्रॅव्हल मार्टच्या माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोहोचविता येईल. ट्रॅव्हल मार्टच्या मदतीचे पर्यटकांसाठी पाच ते दहा दिवसांच्या छोट्या-मोठ्या टूरचे आयोजन केल्यास पर्यटनवाढ होऊन अनेकांच्या हाताला रोजगार मिळेल.

काय आहे केरळ ट्रॅव्हल मार्ट

केरळ ट्रॅव्हल मार्ट पर्यटनवाढीसाठी काम करणारी राज्यस्तरीय संस्था आहे. दरवर्षी राज्यात विविध ठिकाणी पर्यटनवाढीसाठी नॉर्थ व साऊथ केरळमध्ये प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. राज्य सरकारच्या पर्यटन विभागाची महत्त्वाची भूमिका असते. हॉटेल मालक संघ, टूर अँड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन, व्यापारी संघ, वाणिज्य दूतावास यासह हाऊस बोटचे मालक, रेंट कार असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी होतात. प्रदर्शनात सर्व संस्थांचे प्रतिनिधी देश व जगभरातून आलेल्या प्रतिनिधींचे आदरातिथ्य करतात. याठिकाणी राज्यातील पर्यटनाचे मार्केटिंग केले जाते. विविध सोयी-सवलती, आकर्षक योजना, पॅकेजेस याची माहिती दिली जाते. केरळ ट्रॅव्हल मार्टचे प्रतिनिधी दिल्लीतील प्रगती मैदान, मुंबई, पुण्यातील, टुरिझम एक्स्पो, ट्रेड फेअरमध्ये सहभाग घेऊन पर्यटनाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवितात.

कोल्हापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी हेल्प डेस्क उभारावेत

कोल्हापुरात ट्रॅव्हल मार्ट उभारण्याच्या अनुषंगाने कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील विविध पर्यटन ठिकाणी माहिती देणारे हेल्प डेस्क बिंदू चौक, महाराणी ताराराणी चौक आदी शहरातील महत्वाच्या ठिकाणी उभारण्याची गरज आहे. तसेच ‘एमटीडीसी’चे बंद कार्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी संस्था, संघटना, नागरिकांनी शासनाकडे मागणी करणे गरजेचे आहे.

Back to top button