कोल्हापूर : नवरात्रौत्सव आजपासून | पुढारी

कोल्हापूर : नवरात्रौत्सव आजपासून

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : प्राचीन भारतीय कृषी संस्कृतीचा वारसा जपणार्‍या नवरात्रौत्सवाच्या चैतन्यदायी, मंगलमय पर्वास सोमवारी घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. पारंपरिक पद्धतीने सोमवारी सकाळी साडेआठ वाजता मानाच्या तोफेची सलामी झाल्यानंतर श्री करवीर निवासिनी अंबाबाई, नवदुर्गा, जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिर आणि शहरातील विविध मंदिरांसह घराघरांत पारंपरिक धार्मिक विधींसह घटस्थापना करण्यात येणार आहे.

कोरोनाचा कहर कमी झाल्याने यंदा निर्बंधमुक्त नवरात्रौत्सव साजरा होणार असल्याने करवीर नगरीत राज्यासह देशभरातून सुमारे 25 लाख भाविक उपस्थिती लावतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे विशेष तयारी करण्यात आली आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पहाटे मंदिरात धार्मिक विधी होणार आहे. सकाळी साडेआठ वाजता घटस्थापना केली जाणार आहे. यानंतर आरती, साडेअकरा वाजता पंचामृत अभिषेक व दुपारी दोन वाजता आरती. नंतर देवीची अलंकारिक पूजा बांधली जाणार आहे. जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिरातही पहाटे 5 वाजता देवीला अभिषेक होणार आहे. दरम्यान, नवरात्रौत्सवानिमित्त मंदिर विविधरंगी नेत्रदीपक विद्युत रोषणाईने उजळले आहे. मंदिराच्या अंतर्गत परिसराचीही विविध फळा-फुलांनी आकर्षक सजावट केली आहे. नवरात्रौत्सवात देवीची दररोज विविध रूपात पूजा बांधण्यात येणार आहे. दरम्यान, नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येला (रविवारी) श्री अंबाबाईची पारंपरिक पद्धतीने पूजा बांधण्यात आली होती.

दुपारी पावणेदोनपर्यंतचा मुहूर्त

घटस्थापनेसाठी सोमवारी ब्राह्म मुहूर्तापासून, म्हणजे पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत घटस्थापना करून पूजन करता येईल. शुक्रवारी (दि. 30) ललिता पंचमी आहे. 2 ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन असून, त्या दिवशी घागरी फुंकण्याचा कार्यक्रम असेल. 3 ऑक्टोबर रोजी महाष्टमीचा उपवास, 4 ऑक्टोबर रोजी नवरात्रौत्थापन, 5 ऑक्टोबर रोजी विजयादशमी (दसरा) आहे. काही कारणांमुळे ज्यांना 26 सप्टेंबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही, त्यांनी 28 सप्टेंबर, 30 सप्टेंबर किंवा 3 ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी आणि 4 ऑक्टोबर रोजी नवरात्रौत्थापन करावे, असे ‘दाते पंचांग’चे मोहन दाते यांनी सांगितले.

Back to top button