कोल्हापूर : जनता बझारच्या सभेत हाणामारी; दोघे जखमी | पुढारी

कोल्हापूर : जनता बझारच्या सभेत हाणामारी; दोघे जखमी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सभासदांना अहवाल न दिल्याच्या कारणावरून देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-ऑप. कंझ्युमर्स स्टोअर्सच्या (जनता बझार) वार्षिक सभेत रविवारी जोरदार हाणामारी झाली. त्यात संचालक डॉ. सुहास प्रकाश बोंद्रे व ऋषी बोंद्रे हे जखमी झाले.

सभासदांच्या प्रश्नाला उत्तर न देताच सभा गुंडाळल्याचा आरोप विरोधकांनी केला. चेअरमन मदन चोडणकर यांनी सभा सुरळीत पार पाडल्याचा दावा केला. दरम्यान, सभेत झालेल्या हाणामारी प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

संस्थेची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा लक्ष्मीपुरी येथील कार्यालयात पार पडली. सकाळी 11 वाजता सभेला सुरुवात झाली. चेअरमन चोडणकर स्वागत करत असताना संचालक बोंद्रे यांनी वार्षिक सभेचा अहवाल सभासदांना का देत नाही, असा सवाल केला. यावर सत्तारूढ गटाच्या समर्थकांनी तुम्ही कोण विचारणार, असा प्रतिसवाल केला.

यातूनच गोंधळाला सुरुवात झाली. दोन्ही गटांकडून शिवीगाळ झाली. त्यामुळेे सभेतील वातावरण अधिकच तापले. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकारही घडले. विरोधक आणि सत्तारूढ सदस्य एकमेकांना भिडले आणि त्यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी सुरू झाली. हा गोंधळ सुरू असतानाच विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. हाणामारीत दोघेजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सभा संपल्यानंतर संचालक बोंद्रे यांनी पोलिसात तक्रार दिली.

वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देता सत्ताधार्‍यांनी स्वत:च गोंधळ घालत सभा गुंडाळल्याचा आरोप बोंद्रे यांनी केला. संस्थेतील गैरव्यवहार उघड होतील या भीतीने सत्ताधारी व त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला. पण संस्थेतील गैरव्यवहार करणार्‍यांवर कारवाई होईपर्यंत आपला लढा सुरूच राहिल, असे बोंद्रे यांनी सांगितले.

आजच्या घटनेमुळे सभेला गालबोट लागले. जनता बझारला आर्थिक अडचणीतून बाहेर आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे उपाध्यक्ष आकाराम पाटील यांनी सांगितले.

Back to top button