कोल्हापूर : घटस्थापनेची मंदिरांसह घरोघरी तयारी

कोल्हापूर : घटस्थापनेची मंदिरांसह घरोघरी तयारी
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा शारदीय नवरात्रौत्सवास सोमवारपासून सुरू होणार असून याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील प्रमुख पीठ असलेला हा नवरात्रौत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे. या कालावधीत देशभरातून सुमारे 25 लाख भाविक कोल्हापुरात दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनासह देवस्थान समिती सज्ज झाली आहे.

भवानी, टेंबलाई, नवदुर्गा मंदिरे सज्ज

करवीर निवासिनी अंबाबाई, दख्खनचा राजा जोतिबा, जुना राजवाडा येथील तुळजा भवानी मंदिर, टेंबलाई टेकडीवरील त्र्यंबोली मंदिर यासह नवदुर्गा मंदिरांमध्ये नवरात्रौत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. नवरात्रौत्सवानिमित्त दि. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत विविध पारंपरिक धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अत्याधुनिक मेटल डिटेक्टर सुपूर्द

प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सुरक्षेच्या अनुषंगाने सिक्युरिटी ऑडिटसाठी पोलिस प्रशासनाचे विविध विभाग एटीएस, एसआयडी, आयबी, सीआयडी, डीएसबी ही पोलिस पथके उत्सव पूर्व सुरक्षा पाहणी करण्यासाठी येतात. या विभागणी वेळोवेळी सूचित केल्याप्रमाणे देवस्थान समितीच्या सेवा योजनेंतर्गत रत्नाकर बँक व आर.बी.एल. बँकेकडून 3 व भारतीय स्टेट बँक व एसबीआय बँकेकडून 2 अशा एकूण 5 अत्याधुनिक 18 विभागांत तपासणी करणार्‍या तसेच मंदिरात येणार्‍या प्रत्येक भाविकाचे 'फेस कॅप्चरिंग' व 'टेम्परेचर मॉनिटरिंग' करणारे अत्याधुनिक मेटल डिटेक्टर (डीएफएमडी) देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी रत्नाकर बँकेचे व्यवस्थापक सागर कुलकर्णी, भारतीय स्टेट बँकेचे मॅनेजर विवेककुमार सिन्हा, महेश वाघमारे, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष प्रमुख राहुल जगताप व सहा. नियंत्रक अभिजित पाटील, व्यवस्थापक महादेव दिंडे, प्रशांत गवळी आदी उपस्थित होते.

शिवप्रतिष्ठानतर्फे दुर्गामाता दौड

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे प्रतिवर्षीप्रमाणे दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी 7 वाजता, शहरातील विविध भागातून ही दौड निघणार आहे. बुधवार, दि. 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता, छत्रपती शिवाजी चौकातून विजयादशमीची महादौड होणार आहे.

अंबाबाई भक्त मंडळातर्फे आजपासून विविध कार्यक्रम

नवरात्रौत्सानिमित्त श्री अंबाबाई भक्त मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता, देवीची प्रतिष्ठापना होणार आहे. यानंतर दररोज 12 ते 2 यावेळेत, परगावच्या 500 भाविकांना मोफत भोजन प्रसाद, 4 ते 6 यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष संजय साळोखे यांनी केले आहे.

आकर्षक विद्युत यंत्रणेने मंदिर परिसर लख्ख

नवरात्रौत्सवासाठी देवस्थान समितीने संपूर्ण अंबाबाई मंदिर परिसर आकर्षक विद्युत यंत्रणेने लख्ख केला आहे. देवीच्या मूर्तीचे महाद्वारातूनही स्पष्ट दर्शन व्हावे यासाठी 'वॉर्म व्हाईट' बल्ब गाभारा गृहात लावले आहेत. पूर्वी 180 वॅटचे असणारे बल्ब आता केवळ 40 वॅटचे आहेत. यामुळे उष्णताही कमी होणारआहे.

यापूर्वी लाईटिंगमध्ये केवळ मंदिराची पाच शिखरे दिसत होती. मात्र, नव्या इनोव्हेटिव्ह लाईट प्लॅनमुळे मंदिर परिसरातील 108 नक्षीदार खांब, त्यावरील मूर्ती व मंदिर स्थाप्त्याचा भाग पाहता येणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news