Navratri 2022 : कोल्हापूरचे अर्थचक्र गतिमान | पुढारी

Navratri 2022 : कोल्हापूरचे अर्थचक्र गतिमान

कोल्हापूर, सागर यादव : यंदाचा नवरात्रौत्सव जल्लोष, उत्साह आणि धुमधडाक्यात साजरा होणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी सुमारे 25 लाख भाविक-पर्यटक उपस्थिती लावणार असा अंदाज आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्राला गती प्राप्त होणार आहे. नवरात्रौत्सवानिमित्त आगामी पर्यटन हंगाम ‘कॅश’ करण्यासाठी व्यवसायिक सज्ज झाले आहेत.

यंदा नवरात्रौत्सवावर निर्बंध नसल्याने संपूर्ण राज्यासह देशाच्या कानाकोपर्‍यांतून भाविक मोठ्या संख्येने कोल्हापुरात येणार आहेत. यामुळे प्रतिवर्षी 15 ते 17 लाखांपर्यंत असणार्‍या भाविकांची संख्या वाढून 23 ते 25 लाखांच्या घरात पोहोचणार आहे. किंबहुना त्या द़ृष्टीने आवश्यक जय्यत तयारी कोल्हापूर जिल्हा प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

रेस्टॉरंटसह खाद्य विक्रेते सज्ज

नवरात्रौत्सवात मोठ्या संख्येने कोल्हापुरात येणार्‍या पर्यटक, भाविकांसाठी हॉटेल्स, रेस्टॉरंटपासून ते रस्त्यांवरील खाद्य विक्रेत्यांनी जय्यत तयारी केली आहे. विशेषत: अंबाबाई मंदिर परिसरातील सर्व रस्त्यांवरील हॉटेल्स, रेस्टॉरंट, खाद्य पदार्थांची विक्री करणार्‍या व्यावसायिकांकडून पर्यटकांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. अगजी नाश्त्यापासून ते सकाळी व रात्रीच्या जेवणाचा यात समावेश आहे. उपवासाच्या पदार्थांपासून ते मिसळ, वडापाव, भजी, इडली, आंबोळी, शिरा, उप्पीट, पोहे, चहा, तसेच शाकाहारी जेवणापर्यंतची तयारी करण्यात आली आहे.

उलाढाल अन् व्यवसायात वाढ

कोल्हापूरची वैशिष्ट्ये असणार्‍या चप्पला, फेटा, कोल्हापुरी साज, नथ, गूळ, मसाले, तिखट यासह भाविक-पर्यटकांना आवश्यक साहित्याची दुकाने सज्ज आहेत. धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा, होम-हवनासाठी लागणारे साहित्य, फुले, खण, नारळ, उद-धूप, अगरबत्ती, कापूर, गजरा-वेणी, कुंकू-हळद, सुपारी, तांदूळ यासह प्रसादासाठीचे पेढे-फुटाणे, याची विक्री वाढली आहे.

दसर्‍यासाठी इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ सज्ज 

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठा सज्ज झाल्या असून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी वाढली आहे. यंदाचा उत्सव हा निर्बंधमुक्त उत्सव असल्याने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे.

दसर्‍याच्या मुहूर्तावर ग्राहकांना मनसोक्त खरेदी करता यावी, यासाठी शहरातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. दसर्‍यानिमित्त अनेक विक्रेत्यांनी खास सवलत, मोफत भेटवस्तूंची घोषणा केली आहे. यंदा दसर्‍याला नव्या कपड्यांबरोबरच, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर होण्याचा अंदाज असून, सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर ग्राहक भर देण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाही यंदा मोठी मागणी राहण्याची शक्यता आहे. मोबाईल, लॅपटॉप, वॉशिंग मशिन, स्मार्ट टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, मोबाईल, स्मार्ट वॉच, म्युझिक सिस्टीम, कॅराओके, ओव्हन यांना चांगली मागणी आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी झीरो डाऊन पेमेंट, ईएमआय, शून्य टक्के व्याजासह कर्ज आदी सुविधाही देण्यात आल्या आहेत. मोबाईल मध्ये 5 जीमधील अपग्रेड मॉडेलला मागणी वाढली आहे.

शहरातील महाद्वार रोड, शिवाजी रोड, टेंबे रोड, शाहूपुरी , राजारामपुरी व गांधीनगर येथील बाजारपेठांत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स दिल्या जात आहेत. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात व्यापार्‍यांची अपेक्षित उलाढाल झाली. त्यामुळे दसर्‍यानिमित्त खरेदीचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.

कोरोनानंतर ग्राहक मुक्तपणे बाजारपेठेत खरेदीला बाहेर पडला आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशिनला मागणी वाढत आहे. यंदाचा नवरात्रौत्सव व दिवाळीत इलेक्ट्रॉनिक्समध्ये अपेक्षित उलाढाल होईल, अशी अपेक्षा आहे, असे हेडा एन्टरप्राईजेसचे योगेश हेडा यांनी सांगितले.

हॉटेल, यात्री निवास फुल्ल

पर्यटक, भाविकांकडून कोल्हापुरातील हॉटेल्स, यात्री निवासाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. शासकीय विश्रामगृहासह विविध सरकारी-निमसरकारी विश्रामगृहे, होस्टेल्ससाठी विचारणा होत आहे.

Back to top button