कोल्हापूर जिल्ह्यात ‘लम्पी’बाधित जनावरांची संख्या हजारवर | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात ‘लम्पी’बाधित जनावरांची संख्या हजारवर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात लम्पी स्किनच्या बाधित गायवर्गीय जनावरांची संख्या शनिवारी एक हजारवर गेली आहे. आज जिल्ह्यात 176 गायवर्गीय जनावरांना लम्पी स्किन झाल्याचे आढळून आले. तर 8 जनावरांचा मृत्यू झाला. आज अखेर 2 लाख 52 हजार 74 गायवर्गीय जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.

जिल्ह्यात ‘लम्पी’चा प्रादुर्भाव वाढत आहे. आज आणखी 148 गायी व 28 बैलांना ‘लम्पी’ झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ‘लम्पी’ बाधित जनावरांची संख्या 1 हजार 17 झाली आहे. त्यामध्ये 837 गायी व 180 बैलांचा समावेश आहे. रोगमुक्त होण्याच्या दरात वाढ होत आहे. रोग मुक्त होण्याचे प्रमाण 30 टक्यावर आले आहे.

आजअखेर 330 जनावरे रोगमुक्त झाली आहेत. त्यात 245 गायी व 55 बैलांचा समावेश आहे. दिवसात 6 गायी व 2 बैलांचा मृत्यू झाला. ही जनावरे आळते, इचलकरंजी, चंदूर व रांगोळी येथील आहेत. मृत्यू झालेल्या जनावरांची संख्या 44 वर गेली आहे. टोप येथे आज नवीन एपी सेंटर सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात 2 लाख 37 हजार 62 गायी व 15 हजार 12 बैलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणाचे प्रमाणे 85 टक्के आहे.

दूध संस्था व ‘पशुसंवर्धन’ची उद्या संयुक्त बैठक

जिल्ह्यातील जवळपास निम्म्या तालुक्यामंध्ये ‘लम्पी’चा प्रादुर्भाव झाला आहे. ग्रामीण भागामध्ये सहकारी दूध संस्थांचे जाळे चांगले आहे. त्यांच्या समन्वयाने काम सुरू आहे. या कामाची व्याप्ती वाढविण्यासाठी सोमवारी (दि. 26) जिल्हाधिकारी कार्यालयात सहकारी दूध संस्थांचे प्रतिनिधी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलाविण्यात आली आहे.

Back to top button