कोल्हापूर : दागिने, चप्पल, गुळासह मसाल्यातून कोट्यवधीची उलाढाल अपेक्षित | पुढारी

कोल्हापूर : दागिने, चप्पल, गुळासह मसाल्यातून कोट्यवधीची उलाढाल अपेक्षित

कोल्हापूर ; सागर यादव : प्राचीन कृषी संस्कृतीचा वारसा जपणारा सण म्हणून नवरात्रौत्सवाची ओळख आहे. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक विविधता पाहायला मिळते. कालौघात उत्सवाचे स्वरूप बदलले असले तरी याचा मूळ बाज कायम आहे. बारा बलुतेदार व्यावसायिकांच्या सहभागाचा हा उत्सव आहे. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने कला-संस्कृती, परंपरेची देवाण-घेवाण होतच असते. आजही हे चित्र कायम आहे.

व्यावसायिक सज्ज

नवरात्रौत्सवात धार्मिक पर्यटनासाठी येणार्‍या लाखो भाविकांना आकर्षित करणारी अनेक वैशिष्ट्ये रांगड्या कोल्हापुरात पाहायला मिळतात. यात गुळाचा गोडवा, मिरचीचा ठसका, नथ व साजाचा नाजूकपणा, फेट्याचा रुबाबदारपणा, पायताणाचा रांगडेपणा आणि तांबड्या-पांढर्‍याचा चमचमीतपणा आवर्जून असतोच. यामुळेच प्रत्येक पर्यटक कोल्हापुरात भरभरून खरेदी करतो. नवरात्रौत्सवासाठी सुमारे 25 लाख पर्यटक-भाविक कोल्हापुरात उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. व्यावसायिकांनीही पर्यटन व्यवसाय ‘कॅश’ करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.

संबंधित बातम्या

गुळाचा गोडवा अन् तिखटाचा ठसका

कोल्हापुरी गुळाला जगभरातील पर्यटकांकडून पसंती आहे. कोल्हापुरात येणारा माणूस गुळाची खरेदी आवर्जून करतोच. यामुळे नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने येणार्‍या पर्यटक-भाविकांसाठी गुळाची मनसोक्त खरेदी करता येणार आहे. गूळ पावडर, गुळाचे क्यूब, गुळाच्या विविध आकाराच्या वड्या, लहान-मोठ्या ढेपा यासह काकवी, चिक्की, उसाचा रस असे उपपदार्थही उपलब्ध आहेत. गुळाप्रमाणेच कोल्हापुरी तिखटाचा ठसका आणि मसाल्यांनाही मोठी मागणी आहे.

गुजरीसह चप्पल लाईनही सजली

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात असणार्‍या गुजरीत कोल्हापुरी साज, नथ यांसह मराठमोळ्या सोने-चांदीच्या दागिन्यांची विविधता घेऊन सराफ व्यावसायिक सज्ज आहेत. कोल्हापुरी चपलांना पारंपरिक बाजा बरोबरच आधुनिक साजही चढला आहे. पुरुषांच्या चपलांबरोबरच महिला व लहान मुलांच्या चपलांची विविधता चप्पल लाईनला पाहायला मिळत आहे.

कोल्हापुरी फेटा, अन् नऊवारी साडी

रांगड्या व्यक्तिमत्त्वात रुबाबदार फेटा भर घालतो. कोल्हापुरात येणार्‍या पाहुण्यांचे स्वागत-सत्कार कोल्हापुरी फेटा बांधूनच केला जातो. यामुळे नवरात्रीच्या निमित्ताने पर्यटकांसाठी विविध प्रकारचे फेटे घेऊन व्यावसायिक सज्ज झाले आहेत. याच बरोबर घोंगडे, नऊवारी साडी या कोल्हापुरी वैशिष्ट्ये असणार्‍या वस्तूंनाही मोठी मागणी असते.

Back to top button