कोल्हापूर : मौला मुल्लाच्या संपर्कातील 12 साथीदार ‘रडार’वर

कोल्हापूर : मौला मुल्लाच्या संपर्कातील 12 साथीदार ‘रडार’वर
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : 'एनआयए' आणि 'एटीएस'च्या विशेष पथकाने कोल्हापुरात छापा टाकून जेरबंद केलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा मौला नबीसाब मुल्ला (सिरत मोहल्ला, सुभाषनगर) याच्या कारनाम्याची कोल्हापूर पोलिस दलामार्फत चौकशी सुरू आहे. संशयिताच्या संपर्कातील दहा ते बारा स्थानिक साथीदार पोलिसांच्या 'रडार'वर आहेत. त्यांच्या हालचालींवर नजर ठेवल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

बलकवडे म्हणाले, टेरर फंडिंगप्रकरणी संशयाच्या भोवर्‍यात सापडलेल्या 'पीएफआय'चा स्थानिक पदाधिकारी मौला मुल्लाच्या वर्षभरातील हालचाली संशयास्पद होत्या. राजारामपुरी पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवले होते. गतवर्षी दि. 6 डिसेंबर 2021 मध्ये विक्रमनगरमध्ये सार्वजनिक ठिकाणी वादग्रस्त डिजिटल फलक लावून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. चौकशीत त्याचे नाव निष्पन्न होताच गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली होती.

राजारामपुरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे संशयित मौला मुल्ला 'एनआयए'-'एटीएस'च्या जाळ्याला लागला आहे. डिसेंबरनंतर त्याने काही करामती केल्या आहेत का, याचीही सखोल चौकशी सुरू आहे. संशयितांच्या सतत संपर्कात असलेल्या दहा ते बारा साथीदारांची नावेही चौकशीतून पुढे आली आहेत. त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली आहे. शांतता-सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रकार घडल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

संशयित मुल्लासह त्याच्या साथीदारांकडून समाजविघातक कृत्ये घडली असल्यास नागरिकांनी त्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालय अथवा राजारामपुरी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांना द्यावी. संबंधितांच्या नावाबाबत गोपनीयता पाळण्यात येईल, असेही बलकवडे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news