स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनाने रिचार्ज; आंदोलनातून उभारी | पुढारी

स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनाने रिचार्ज; आंदोलनातून उभारी

जयसिंगपूर; संतोष बामणे : राजू शेट्टी यांचा लोकसभेत झालेला पराभव… विधानसभा निवडणुकीत आलेले अपयश…आणि त्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आलेली मरगळ दूर करण्यात पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेेली पंचगंगा परिक्रमा फायद्याची ठरल्याचे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.

गेल्या पाच दिवसांत शेतकरी हजारोंच्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले. अखेर राज्य सरकारला ही या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी व ‘स्वाभिमानी’ला एक विधान परिषदेची जागा देण्याचे ठरले होते. गेल्या वर्षभरापासून महाविकास आघाडीच्या 12 आमदारांच्या निवडीचा प्रश्न प्रलंबित आहे. चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन 12 आमदारांची विधान परिषदेवर निवड करण्याची मागणी केली होती.

या यादीतून राजू शेट्टी यांचे नाव वगळल्याची चर्चा नेमकी परिक्रमा आंदोलनादरम्यान पसरल्याने ‘स्वाभिमानी’च्या गोटात अस्वस्थता पसरली. परंतु, शेट्टी यांनी आमदारकी गेली उडत, असे म्हणत राज्य सरकारला टार्गेट केले. त्यामुळे कार्यकर्त्यांतील संभ्रम दूर झाला आणि ते अधिकच उत्साहाने पदयात्रेत सहभागी झाले. विशेषत: या पदयात्रेत मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग सहभागी झाला होता. प्रत्येक गावात झालेल्या उत्साही स्वागताने स्वाभिमानी संघटनेला चांगलेच बळ मिळाल्याचे दिसत आहे.

ऊस परिषदेची आठवण

प्रतिवर्षी जयसिंगपूर येथे ‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद होत असते. या परिषदेला राज्यातून शेतकर्‍यांची गर्दी होत असते. शेतकरी, पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेत शेतकरी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. ही सभा नृसिंहवाडी बसस्थानकात झाल्याने सर्व शेतकर्‍यांना ऊस परिषदेची आठवण झाली.

सरकारवर आसुडाचे फटके

पदयात्रेत ऊस परिषदेप्रमाणे गावोगावी झेंडे, फलक हे पाहायला मिळाले. विशेषत: पदयात्रेत शेतकर्‍यांनी सरकारवर आसुडाचे फडके ओढत ‘स्वाभिमानी’च्या विविध आंदोलनांची आठवण करून दिली.

Back to top button