कोल्हापूर : कावळा नाका रेस्ट हाऊसची जागा खासगी विकसकाला

कोल्हापूर; डॅनियल काळे : शहरातील काव?ळा नाका रेस्ट हाऊस या नावाने ओळखली जाणारी व हेरिटेज वास्तू वर्ग-2 मध्ये समाविष्ट असलेली शहराच्या मोक्याच्या ठिकाणची इमारत व जागा दीर्घ मुदतीने खासगी विकसकाच्या घशात घालण्याचा डाव रचण्यात आला आहे.
ही सुमारे 1 एकर सरकारी जागा रस्ते विकास महामंडळाकडे आहे. ही इमारत हेरिटेजमधून वगळावी, असे पत्र कोल्हापूर महापालिकेला पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर ही जागा सार्वजनिक, निमसार्वजनिक वापरातून ?वाणिज्य वापराकरिता खुली करावी, अशी मागणीही रस्ते महामंडळाने केली होती. याबाबत महापालिकेनेही राज्य शासनाकडेच मार्गदर्शन मागितले आहे. तर हेरिटेज समितीने आपल्या अभिप्रायामध्ये ही इमारत हेरिटेजमधून वगळण्याचा अधिकार या समितीला नसल्याचे नमूद करत आपले हात झटकून चेंडू शासनाकडे टोलवला आहे.
महापालिका प्रशासनाने याबाबतचा अहवाल 14 सप्टेंबर रोजी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात काव?ळा नाका रेस्ट हाऊस ही हेरिटेज वास्तू वर्गवारीतून बाहेर काढली जाण्याचा धोका आहे. ही वास्तू पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची होती. 2016 मध्ये त्यांनी ही जागा रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित केली आहे. या महामंडळाने ही जागा व्यापारी तत्त्वावर विकसित करण्याचे धोरण ठरविले आहे. त्यासाठी महामंडळाने ही जागा दीर्घ मुदतीच्या भाडेकराराने देण्यासाठीची निविदा प्रसिद्ध केली आहे.
विकास योजनेमध्ये सार्वजनिक, निमसार्वजनिक वापर या विभागात ही इमारत व जागा दाखविली आहे. महामंडळाला ही जागा विकसित करताना हा मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे महामंडळाने महापालिकेकडे ही जागा वाणिज्य वापरासाठी आरक्षित करावी, अशी मागणी केली होती. ही इमारत पूर्वी ‘ट्रॅव्हलर्स बंगला’ या नावानेही ओळखली जात होती. त्यामुळे याबाबतीत राज्य शासन आता काय निर्णय घेते? याकडे लक्ष लागून राहिले आहे.