कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाईसाठी शासनाकडे दीड कोटीची मागणी | पुढारी

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाईसाठी शासनाकडे दीड कोटीची मागणी

कोल्हापूर; सचिन टिपकुर्ले :  ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी व पुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जिरायत व बागायती पिकांखालील 740.92 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यात जिल्ह्यातील 5 हजार 312 शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे नुकसानभरपाई म्हणून 1 कोटी 52 लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने पुन्हा जोर धरला. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे तीनवेळा उघडले. तर पंचगंगा नदीही तीनवेळा पात्राबाहेर आली. अनेक गावातील बंधारे पाण्याखाली गेले तर नदीचे पाणी शेतात शिरले. अनेक दिवस पाणी राहील्याने हाताला आलेले भाताचे पीक, सोयाबीन, भुईमुगाचे नुकसान झाले. दरवर्षी अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, नृसिंहवाडी, कुरुंदवाड परिसराला मोठा फटका बसतो, पण ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कागल तालुक्याला बसला आहे.

33 टक्क्याांवर ज्या तालुक्यातील शेतीचे नुकसान झाले आहे त्याचा अहवाल कृषी विभागाने नुकताच जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. यात कागल तालुक्यातील सर्वाधिक 1 हजार 373 शेतकरी बाधित झाले असून त्याचे 222 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. याबरोबर राधानगरी तालुक्यातील 333 शेतकर्‍यांचे 33.31 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. भुदरगड मधील 243 बाधित शेतकर्‍यांचे 24.20 हेक्टर व करवीर तालुक्यातील 169 बाधित शेतकर्‍यांचे 24.58 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे व पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा हा 1 कोटी 52 लाख रुपये असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने नुकसानभरपाईची मागणी शासनाकडे केली आहे.

जिल्ह्यातील बाधित शेतकरी, क्षेत्र व नुकसानभरपाईची मागणी

बाधित शेतकरी               बाधित क्षेत्र (हेक्टर मध्ये)                     अपेक्षित निधी
5 हजार 312                       740.92 हेक्टर                         1 कोटी 52 लाख रुपये

Back to top button