कोल्हापूर : गुन्हेगारी रोखण्याचे कोडोली पोलिसांसमोर आव्हान | पुढारी

कोल्हापूर : गुन्हेगारी रोखण्याचे कोडोली पोलिसांसमोर आव्हान

कोडोली; संजय भोसले : जोतिबा डोंगर पायथ्याशी असलेला गिरोली घाट हा निर्जन परिसर आहे. हेच ठिकाण खुनी व गुन्हेगारांना अनुकूल ठरत आहे. या घाट परिसरामध्ये वाटमारीचेही प्रकार घडत आहेत. पांडवलेणी परिसरामध्ये प्रेम प्रकरणातून कॉलेज युवतीचा प्रियकराने खून केल्याच्या घटनेने पुन्हा एकदा गिरोली घाट चर्चेत आला आहे. त्यामुळे या परिसरावर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे. येथील गुन्हे उघडकीस आणण्याचे कोडोली पोलिसांसमोर आव्हानच आहे.

जोतिबा डोंगराच्या पूर्वेस पायथ्याशी असलेला गिरोली घाटदरम्यान रस्त्यालगतचा दाणेवाडी, जाखले, केखले, गिरोली व कुशिरे या गावांच्या हद्दीतील परिसर बर्‍यापैकी निर्जन आहे. जोतिबा यात्रेदिवशी येथे मोठ्या प्रमाणात असते. येथे एरव्ही वर्दळ अत्यल्प असते. येथे वन्य प्राण्यांचे वास्तव्य असल्यानेही या भागामध्ये सहसा एकटेदुकटे कुणी फिरकत नाही. येथे असणारी दाट झाडेझुडपे खोल दरी याचा गैरफायदा गुन्हेगार घेत आहेत. परप्रांतामधील वा जिल्ह्याच्या अन्य भागांतील सराईत गुन्हेगार या परिसरामध्ये येऊन खून व इतर गैरकृत्ये करीत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस हा परिसर धोकादायक बनत आहे. त्याचबरोबर या घाट परिसरामध्ये वाटमारीचेही प्रकार घडत आहेत. बेवारस वाहनेही या परिसरामध्ये आढळून येत आहेत. या घाटातील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहीम वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी राबवावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

प्रेमीयुगुलांचा वावर वाढला

गिरोली घाट परिसरात प्रेमीयुगुलांचा वावर वाढला आहे. त्यामुळे त्यांच्यामधील अंतर्गत वादामुळे येथे खुनासारख्या घटना घडत आहेत. गिरोली घाट परिसर कोडोली पोलिस ठाणे हद्दीत येतो. या परिसरातील गुन्हे उघडकीस आणण्याचे कोडोली पोलिसांसमोर आव्हान आहे. या घाट परिसरामध्ये अनेकवेळा बेवारस मृतदेह पोलिसांना आढळून आले आहेत. त्यांचाही तपास पोलिसांना लागलेला नाही. त्यातच मंगळवारी रात्री गिरोली घाटातील पांडवलेणी परिसरामध्ये प्रेम प्रकरणातून एका कॉलेज युवतीचा खून केल्याची घटना घडल्याने पुन्हा एकदा गिरोली घाट चर्चेत आला आहे.

Back to top button