कोल्हापूर जिल्ह्यात 24 टक्के कमी पाऊस | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात 24 टक्के कमी पाऊस

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात आजअखेर वार्षिक सरासरीच्या 24 टक्के कमीच पाऊस झाला आहे. पावसाच्या उरलेल्या दहा दिवसांत सरासरी इतका पाऊस होईल, याची शक्यता फारच कमी आहे. यामुळे गेल्या 18 वर्षांतील हे कमी पावसाचे तिसरे वर्ष ठरेल, असेच चित्र आहे. दि. 20 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ 76.11 टक्केच पाऊस झाला आहे.

सर्वाधिक पाऊस अशी जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण कमी होत आहे. गेल्या 18 वर्षांत केवळ सातच वर्षी सरासरीपेक्षा जादा पाऊस झाला आहे. पावसाचे वार्षिक प्रमाण कमी होत असतानाच कमी वेळात जादा पाऊस पडण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. ढगफुटी सद़ृश पावसाचे प्रकार वाढत चालले आहे. पावसाने वार्षिक सरासरी गाठली नसली तरी गेल्या वर्षी आजवरचा सर्वात भीषण महापूर आला होता. पंचगंगेची कोल्हापुरात आजवरची सर्वोच्च पाणी पातळी गाठली. मात्र, सरासरी इतका पाऊस झाला नाही.

यावर्षीही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण फारसे समाधानकारक राहिलेले नाही. पावसाळा संपण्यास आता केवळ दहा दिवस राहिले आहेत, या कालावधीत वार्षिक सरासरी गाठण्याची शक्यता कमीच आहे. वार्षिक सरासरी गाठण्यासाठी या दहा दिवसांच्या कालावधीत दररोज सरासरी 41 मि.मी. पावसाची गरज आहे. मात्र, तितका पाऊस पडण्याची शक्यता नाही. जिल्ह्यातील प्रमुख 15 पैकी सहा धरण क्षेत्रातच गतवर्षीपेक्षा आजअखेर जादा पाऊस झाला. मात्र, हा पाऊसही तुलनेने अधिक नाही.

सर्वाधिक पावसाच्या तालुक्यात कमी पाऊस

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यात होतो. मात्र, या तालुक्यात यावर्षी कमी पाऊस झाला आहे. यासह चंदगड, आजरा आणि पन्हाळा या जादा पावसाच्या तालुक्यातही सरासरी इतका पाऊस होणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे.

Back to top button