कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सध्या सणावारांचे दिवस सुरू झाले आहेत. यानिमित्ताने साहजिकच दागिन्यांची खरेदी केली जाते. त्यातच सराफ बाजारात सोन्याच्या किमतीत घट झाली असून चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. सोन्याच्या दरातील घसरणीचा लाभ घेत ग्राहकांना सुवर्ण खरेदीची संधी यानिमित्ताने मिळाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदी दरात घसरण सुरू आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच 51 हजार 800 रुपये प्रतितोळा जीएसटीसह सोन्याचा भाव होता. त्यानंतर आठवडाभरातच आठशे रुपयांची उसळी सोन्याच्या दरात झालेली पाहायला मिळाली; मात्र सध्या पुन्हा घट झाली असून मंगळवारी (दि. 20) सोन्याचा भाव 50 हजार 900 इतका असून महिन्याच्या सुरुवातीपासून आजअखेर 900 रुपयांची घट सोन्याच्या दरात झाली आहे.
याउलट चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना पाहायला मिळाली. या महिन्याच्या पहिल्या दिवशी 54 हजार 200 रुपये प्रतिकिलो जीएसटीसह चांदीचा दर होता. आठवडाभरात 700 रुपयांची चांदी दरात वाढ झाली. ही वाढ आजअखेर कायम असून चांदीची किंमत 57 हजार 500 रुपयांवर पोहोचली आहे. चांदीमध्ये या महिन्यात 3300 रुपयांची वाढ झाली आहे. शेअर मार्केटसह आंतरराष्ट्रीय बाजारामधील घडामोडींवर सोन्या-चांदीचे दर अवलंबून आहेत. सध्या सोन्या-चांदीच्या दरांतील चढ-उताराची स्थिती पुढील काही दिवस सारखीच राहणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.