कोल्हापूर जिल्ह्यात ‘लम्पी’ने आठ जनावरांचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात ‘लम्पी’ने आठ जनावरांचा मृत्यू

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात लम्पीस्कीनचा प्रसार वाढतच आहे. हातकणंगले, पन्हाळा, शिरोळपाठोपाठ करवीर तालुक्यातही लम्पीस्कीनचा शिरकाव झाला आहे. मंगळवारी गायवर्गीय 20 जनावरांना लागण झाल्याचे आढळून आले. यामध्ये शहरातील 3 भटक्या गायींचा समावेश आहे. मंगळवारी लम्पीमुळे 4 गायी व 4 बैलांचा मृत्यू झाला. दरम्यान, ज्या गावांमध्ये लम्पीची जनावरे आढळून आली आहेत, त्या गावांमध्ये इपी सेंटर स्थापन करण्यात आली आहेत.

जिल्ह्यात लम्पीस्कीनची लागण झालेली पहिली गाय अतिग्रे (ता. हातकणंगले) येथे आढळून आली. शेजारच्या गावांमध्ये त्याचा प्रसार होऊ लागला. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येऊ लागल्या. मंगळवारी दिवसभरात आणखी 20 गायवर्गीय जनावरांना लम्पी झाल्याचे आढळून आले. त्यामध्ये सर्वाधिक 10 जनावरे रुई गावातील आहेत. याशिवाय बहिरेवाडी 3, पारगाव 2 व रुकडी येथे 5 गायवर्गीय जनावरांचा समावेश आहे. जाखले, मुडशिंगी, चंदूर व रुई येथे बैलांचा, तर पारगाव, अतिग्रे, हातकणंगले व रांगोळी येथील गायींचा अशा 8 जनावरांचा मृत्यू झाला.

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने हातकणंगले व पन्हाळा तालुक्यांतील अतिग्रे, कबनूर, रांगोळी, तारदाळ, कोडोली या गावांत इपी सेंटर स्थापन करण्यात आली असून, त्याच्या 5 कि.मी.च्या परिसरात येणार्‍या 27 गावांमध्ये पशुवैद्यकीय पथकांमार्फत उपचार व लसीकरण सेवा मोफत सुरू आहे. तरी पशुपालकांनी न घाबरता पशुवैद्यकीय पथकास सहकार्य करावे, असे अवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए. पठाण यांनी केले आहे.

Back to top button