कोल्हापूर : रेशन धान्य प्रश्नावरून शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा | पुढारी

कोल्हापूर : रेशन धान्य प्रश्नावरून शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : रेशनचा अधिकार कायम राहावा, उत्पन्नावर आधारित रेशन कार्ड बंद करू नका, अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करा या व अशा अन्य मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकरी राहुल रेखवार यांना देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे व शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांनी केले.

दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोडमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. आंदोलकांच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या रेशन विरोधी धोरणांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र व राज्य सरकारचे अन्न धान्य वितरण प्रणाली बंद करण्याचे धोरण आहे. अन्नसुरक्षा या तत्त्वावर या देशात गोरगरिबांना अन्नधान्य रेशनवर वितरण प्रणाली सुरू होणे गरजेचे आहे. आर्थिक निकषावर रेशन कार्ड बंद करणे, एपीएल व गहू-तांदूळ बंद करणे, घरगुती गॅसचे वाढते दर यामुळे सामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे.

सरकारने केशरी रेशन कार्डवर गहू, तांदूळ व डाळ द्यावी, गॅस सिलिंडरची किंमत 500 रुपये कायम करावी, बायोमेट्रिक पद्धत बंद करावी, अन्नसुरक्षा योजनेचा इष्टांक वाढवा, रेशनमधील भ्रष्टाचार थांबवा आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता. यावेळी हर्षल सुर्वे, मंजीत माने, राहुल माळी, महेश उत्तुरे, दीपाली शिंदे, सुशील भांदिगरे, विशाल देवकुळे व शिवसैनिक मोठ्या संख्येेन उपस्थित हेाते.

Back to top button