कोल्हापूर : नवरात्रौत्सवासाठी दांडिया ग्रुप सज्ज… | पुढारी

कोल्हापूर : नवरात्रौत्सवासाठी दांडिया ग्रुप सज्ज...

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नवरात्रौत्सव आणि गरबा, दांडिया यांचे समीकरणच आहे. यामुळे नवरात्रौत्सवाच्या धार्मिक कार्यक्रमांबरोबरच दांडियाचीही तयारी सुरू आहे. विशेषत: तरुण मंडळी यात आघाडीवर आहेत. कोव्हिडच्या दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त नवरात्रौत्सवामुळे दांडिया खेळण्यासाठी अवघे सज्ज झाले आहेत.

दांडियाचा खेळ शिकण्यासाठी ठिकठिकाणी विविध संस्थांच्या वतीने क्लासेस सुरू करण्यात आले आहेत. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे गुजरातमधील कोरिओग्राफर कोल्हापुरात येऊन लेटेस्ट गरबा, दांडिया शिकवत आहेत. विविध नवरात्रौत्सव मंडळे, महिला मंडळे, संस्था-संघटनांच्या वतीने गरबा-दांडियाचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते. त्यानुसार सरावही सुरू आहे. याशिवाय डान्स अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून सध्या सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन बॅचमध्ये दांडिया शिकविले जात आहे.

दांडिया, पोशाख अन् गीतांच्या सीडी…

गरबा दांडियात हिंच, दोडियो, पोपटीयो, दोन ताली, छगडी, रास गरबा, टिटाडा असे अनेक प्रकार खेळले जातात. गरबा खेळताना महिला-मुली घागरा, चोली आणि ओढणी परिधान करतात तर पुरुष पारंपरिक धोती व कुर्ता परिधान करतात. यामुळे गरबा, दांडिया खेळण्यासाठी लागणार्‍या दांडियाबरोबरच कपडे व विविध साहित्य खरेदीला गर्दी होत आहे. एक घागरा चोलीच्या सेटची किंमत एक ते दहा हजारांपर्यंत आणि धोती व कुर्त्याची किंमत 500 रुपयांपासून ते 10 हजार रुपयांपर्यंत आहे.

तब्बल दोन वर्षांनंतर यावर्षी मोठ्या प्रमाणात मनमुराद गरबा-दांडिया खेळला जाणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये तसेच गरबा प्रेमींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. गरबा खेळण्यासाठी विविध गाण्यांचीही निवड करण्यात आली आहे. यात गुजराती, हिंदीसह विविध भाषांमधील नव्या-जुन्या गीतांचा समावेश आहे. ‘घुंघट में चाँद होगा…’, ‘ढोली-तारो ढोल बाजे…’, ‘मै तो भूल गयी बाबूल का देस..’ यांसह विविध गीतांचा समावेश आहे. या गीतांच्या सीडीही दांडिया ग्रुप आवर्जून खरेदी करत आहेत.

Back to top button