कोल्हापूर : नोकरी देण्याच्या आमिषाने युवकांना कोट्यवधीचा गंडा, काेलकाता येथील संशयिताचा शाेध सुरु | पुढारी

कोल्हापूर : नोकरी देण्याच्या आमिषाने युवकांना कोट्यवधीचा गंडा, काेलकाता येथील संशयिताचा शाेध सुरु

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : विविध ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून दाम दुपटीच्या अमिषाने अनेकांची फसवणूक झाली हे प्रकरण ताजे असतानाच आता नोकर भरतीचे आमिष दाखवून एका भामट्याने जिल्ह्यातील युवक व पालकांना दीड ते पावणेदोन कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार कुरुंदवाड शहरात समाेर आला आहे. आयकर खात्यात व भारतीय सैन्‍यदलात भरती करतो, असे सांगून काेलकाता येथील एकाने कुरुंदवाडसह कोल्हापूर जिल्ह्यातील १९ युवकांना गंडा घातल्याची तक्रार आनंदा गणपती करडे (रा.कुरुंदवाड,ता.शिरोळ) यांनी कुरुंदवाड पोलीस व जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे दिली आहे. सुबोधकुमार (रा.कलकत्ता) असे फसवणूक केलेल्याचे नाव आहे.

फसवणूक झालेल्या युवकांनी सुबोधकुमारने दिलेल्या बँक खाते क्रमांकावर पैसे पाठवले आहेत. यासर्व बँकेच्या नोंदी तक्रारीसोबत सादर केल्या आहेत. आयकर विभागातून माहिती घेण्यात आली आहे ही फसवणूक झाली असूनण आर्थिक गुन्हे अन्वेषण मार्गदर्शन मागितले आहे. दोन दिवसात गुन्हा दाखल करणार असल्याचे सपोनि बालाजी भांगे यांनी सांगितले.

आनंदा करडे यांच्या एका मुलाला आयकर विभाग दिल्ली येथे तर दुसऱ्या मुलाला आर्मीत भरती करतो, असे सुबोधकुमारने सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी असे पंधरा लाख रुपये घेतले. यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी आर्मीत ३५ मुलांची बॅच पाठवायची असून आणखीन मुले असतील तर घेऊन या, असेही सांगितले होते.  जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा, कोल्हापूर, इचलकरंजी, शिरोळ कुरुंदवाड येथील १८ युवक, पालकांनी नाेकरीच्‍या आमिषाने सुबोधकुमार याच्या वेळोवेळी मागणीनुसार लाखो रुपये खात्यावर जमा केले.

या युवकांना सुबोधकुमारने ट्रेनिगसाठी काेलकाता येथील कमांडर हॉस्पिटल येथे उपस्थित करून विविध कागदपत्रांवर सह्या घेतल्या व पोस्टाने तुम्हाला पत्र येईल असे सांगितले. याच दरम्यान पालकांचा सुबोध कुमार याच्याशी फोनवरून संपर्क सुरू होता. मात्र, २५ जुलै २०२२ पासून सुबोध कुमारचा फोन बंद आहे. त्याच्याशी आजपर्यत पालकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्‍याचा संपर्क झाला नाही. यानंतर सुबोधकुमारने फसवणूक केली असल्याची खात्री पालकांची झाली.

पालकांनी शेतावर, घरावर, वाहनावर, कर्ज काढून  किंवा साेन्‍याचे दागिने विकून सुबोधकुमारला पैसे दिले आहेत. नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळी राज्यात-जिल्ह्यात कार्यरत आहेत. या टाेळीच्‍या मुसक्या आवळण्‍याचे आव्‍हान पोलीस प्रशासनासमाेर आहे.

हेही वाचा :  

Back to top button