कोल्हापूर : उमद्या राजच्या मृत्यूने कोल्हापूरकर हळहळले | पुढारी

कोल्हापूर : उमद्या राजच्या मृत्यूने कोल्हापूरकर हळहळले

उजळाईवाडी; पुढारी वृत्तसेवा : सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत धावताना कोल्हापूरच्या राज कांतिलाल पटेल (वय 32, रा. मार्केट यार्ड, कोल्हापूर) या उमद्या उद्योजकाच्या मृत्यूने अवघे कोल्हापूरकर हळहळले. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील प्रसिद्ध उद्योजक व पटेल पेट्रो कंपनीचे मालक कांतिलाल (कनुभाई) पटेल यांचा राज हा एकुलता मुलगा.

उच्चविद्याविभूषित राज यांनी आयआयटीएन पदवी संपादन केली होती. मनाने निर्मळ व खिलाडू वृत्तीचे राज नेहमीच विविध मॅरेथॉन स्पर्धेत भाग घ्यायचे. जीवन लॅबोरेटरीच्या माध्यमातून त्यांनी कोरोना काळात गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा) येथे कॅम्प आयोजित करून उद्योजकांना लसीकरण करून सामाजिक कार्यात असलेली तत्परता दाखवून दिली होती. त्यांचा विवाह कोल्हापूरचे प्रसिद्ध डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी व अस्मिता कुलकर्णी यांची कन्या डॉ. तन्वी यांच्याशी झाला. त्यांना एक मुलगा असून तो 11 महिन्यांचा आहे. राज यांच्या जाण्याने पटेल परिवार पोरका झाला आहे. एक हुशार व उमदा उद्योजक हरपल्याने गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज यांचा मृतदेह दुपारनंतर राजर्षी शाहू मार्केट यार्ड परिसरातील प्रज्ञापुरी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला. राज यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांचे नातेवाईक, पाहुणे, मित्रमंडळी व क्रीडा क्षेत्रातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी पंचगंगा स्मशानभूमीत राज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्वत:ची क्षमता ओळखणे अत्यावश्यक

सातारा येथील हिल मॅरेथॉनमध्ये क्रीडानगरी कोल्हापुरातील 32 वर्षीय उमदे व तरुण खेळाडू राज पटेल यांचा हृदयविकारामुळे रविवारी
मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. नियमित व्यायाम करणारा, सरावात असणार्‍या आणि विविध
मॅरेथॉनमध्ये सातत्याने सहभागी होणार्‍या अनुभवी खेळाडूवर आलेला हा दुर्दैंवी प्रसंग सर्वांनाच विचार करायला लावणारा आहे.

बॉडीचे सिग्नल लक्षात घ्या

बर्‍याचदा आपले शरीर पूर्वसूचना देते. दम लागणे, थकवा जाणवणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, चक्कर मारणे, पडल्यासारखे होणे
अशा गोष्टी घडतात. हे बॉडीचे सिग्नल लक्षात घेऊन खेळाडूंनी तातडीने निर्णय घेणे अत्यावश्यक असते. असे सिग्नल मिळताच खेळाडूंनी
तातडीने थांबणे, त्वरित उपचार घेणे अत्यावश्यक असते.

– चेतन चव्हाण (कोल्हापूर स्पोर्टस् क्लब)

क्षमता लक्षात घेऊन वाटचाल आवश्यक

कोणत्याही खेळप्रकारात खेळाडूंनी स्वत:च्या क्षमता लक्षात घेऊन वाटचाल करणे अत्यावश्यक आहे. आरोग्याविषयी असणार्‍या समस्या,
वयोमान, औषधे, सराव, शारीरिक क्षमता अशा प्रत्येक गोष्टींचा विचार करावा. अतिउत्साहीपणा, भावनाशीलता, ताकदीचा क्षमतेपेक्षा अधिक वापर अशा गोष्टी टाळणे गरजेचे आहे.
– डॉ. झुंजार माने (मॅरेथॉनपटू व प्रशिक्षक)

पटेल कुटुंबीयांच्या दु:खात गोशिमा सहभागी

अत्यंत हुशार व उमदे व्यक्तिमत्त्व असलेले युवा उद्योजक राज पटेल यांचे निधन धक्कादायक आहे. गोशिमाचे निमंत्रित संचालक कांतिलाल पटेल यांच्यावर कोसळलेल्या दुःखात गोशिमा परिवार सहभागी आहे.
– मोहन पंडितराव (अध्यक्ष, गोशिमा)

Back to top button