पन्हाळगडाची डागडुजी करा; जल्हाधिकारी रेखावार यांच्या सूचना, तज्ज्ञ समितीकडून करणार गडाची पाहणी | पुढारी

पन्हाळगडाची डागडुजी करा; जल्हाधिकारी रेखावार यांच्या सूचना, तज्ज्ञ समितीकडून करणार गडाची पाहणी

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा: किल्ले पन्हाळा येथील ऐतिहासिक बुरुज व तटबंदीवरील झाडेझुडपे, झाडांची मुळे काढून तटबंदीची व बुरुजांची स्वच्छता करावी, असे आदेश पुरातत्त्व खात्यास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शुक्रवारी दिले. दरम्यान, तज्ज्ञ समितीने गडाची पाहणी केली.

पन्हाळा येथील ढासळणारे बुरुज व तटबंदी संवर्धनासाठी असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट आणि इंजिनिअर, कोल्हापूर यांच्या पुढाकाराने व जिल्हाधिकारी रेखावार यांच्या सहकार्याने अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. पन्हाळगडावरील बुरुज व तटबंदीची पाहणी तज्ज्ञांच्या समितीने पाहणी केली. येथे शुक्रवारी दिवसभर स्ट्रक्चरल संवर्धनतज्ज्ञ अभियंता चेतन रायकर (मुंबई) तसेच जिओलॉजिकल कन्सल्टंट इंजिनिअर बाबा जगताप (पुणे), डॉ. जे. डी. पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. सारीपुत नवघरे, इंजिनिअर महेश हनमावले यांनी पन्हाळा येथील ऐतिहासिक राजदिंडी येथील ढासळलेल्या बुरुजाची तसेच चार दरवाजा येथील भेगाळलेल्या बुरुजाची, तीन दरवाजा, तसेच तटबंदीची पाहणी केली.

तज्ज्ञ समितीने नोंदविलेल्या निरीक्षणाची तसेच त्या अनुषंगाने करावयाच्या कामांचा अहवाल तयार करण्यास असोसिएशनने सुरुवात केली आहे. हा अहवाल जिल्हा प्रशासनास व पुरातत्त्व विभागास सादर केला जाणार आहे. पन्हाळा गड पाहणीनंतर सायंकाळी जिल्हाधिकारी रेखावार यांच्याबरोबर या समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी रेखावार यांनी गडाच्या तटबंदीवरील व बुरुजांवरील वाढलेली झाडेझुडपे काढण्याचे आदेश दिले. या झाडा-झुडपांमुळेदेखील दगड ढिसूळ होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

पन्हाळा नगर पालिकेने गडावरील सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने केला आहे का? याचीदेखील पाहणी करण्याची सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिली आहे. पन्हाळगड संवर्धनासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलल्यामुळे पन्हाळा नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्सचे अध्यक्ष अजय कोराने, अंजली जाधव, प्रशांत हडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीयुत काटकर, उपअभियंता धनंजय भोसले, पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील यावेळी उपस्थित होते.

पुरातत्त्व विभाग करणार ड्रोनद्वारे गडाची पाहणी

भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने लवकरच स्वतंत्रपणे ड्रोनच्या माध्यमातून ढासळणार्‍या तटबंदीची व बुरुजांची पाहणी करणार असल्याचे पुरातत्त्व विभागाचे सर्वेक्षण सहायक विजय चव्हाण यांनी सांगितले.

Back to top button