मुश्रीफ-घाटगे एकाच व्यासपीठावर आले खरे, पण राजकीय शेरेबाजी झालीच नाही!

मुश्रीफ-घाटगे एकाच व्यासपीठावर आले खरे, पण राजकीय शेरेबाजी झालीच नाही!

Published on

मुरगूड ; पुढारी वृत्तसेवा : शुक्रवारी (दि. 16) मुरगूडमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकीय हाडवैर असलेले आमदार हसन मुश्रीफ व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे एकाच व्यासपीठावर आले, पण दोघांनीही राजकीय शेरेबाजी न करता एकमेकाकडे पाहणेही टाळले. यामुळे उपस्थितांनी बरेच काही समजून घेतले.

निमित्त होते ते मुरगूड नगरपालिका शताब्दीपूर्तीनिमित्त यापूर्वीच्या उपस्थित आयोजनानुसार कार्यक्रमास येणे जमले नाही. आज शहीद जवानांच्या वारसांच्या सत्कार समारंभास येण्यास माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना येण्यास मुहूर्त मिळाला.

ते एकाच व्यासपीठावर येऊन काय बोलणार? याची सर्वांनाच उत्कंठा लागली होती, पण हे दोन्ही नेते आपापल्या समर्थकांसह कार्यक्रमस्थळी येताच तणाव वाढला. सर्वांच्या नजरा या दोन नेत्यांवर राहिल्या. त्यांच्या देहबोलीवर त्याचा परिणाम जाणवत होता. व्यासपीठावर बसताना अंतर सोडूनच ते आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन बसले.

एकमेकाकडे त्यांनी कटाक्षही न टाकता आपल्या भाषणात श्री. घाटगे यांनी राजकीय टीकाटिप्पणी न करता राजकीय मतभेद चालू राहतील, पण चांगल्या कार्यक्रमास राजकारण बाजूला ठेवावे लागते, अशी मिश्कील टिप्पणी केली. यानंतर ते आमदार मुश्रीफ यांच्या भाषणापूर्वीच निघून गेले. त्यानंतर श्री. मुश्रीफ यांनीही घाटगे यांचा नामोल्लेख टाळून आपण विकासासाठी कोठेही कमी पडणार नसल्याचे सांगून आपण बोलण्यापेक्षा करून दाखवतो व सत्ता असणार्‍यांचा व सत्ता नसणार्‍यांचा सर्वांचाच आमदार असल्याचे सांगितले.

मुश्रीफ व घाटगे आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह कार्यक्रमाच्या ठिकाणी घोषणाबाजी करीत पोहोचले. त्यामुळे भाषणबाजीतून चकमक होईल, अशी उपस्थितांनी अटकळ बांधली होती, पण नेत्यांचे संयमी झालेले भाषण आणि कार्यक्रम संपण्यापूर्वीच एक नेते निघून जाण्याने वातावरण शांत होत निवळले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news