कोल्हापूर : कोरोनानंतर वृद्धाश्रमासाठी वेटिंग! | पुढारी

कोल्हापूर : कोरोनानंतर वृद्धाश्रमासाठी वेटिंग!

कोल्हापूर ; पूनम देशमुख : वृद्धाश्रम ओस पडणे हे खरे तर सशक्त समाजाचे लक्षण; मात्र आज वृद्धाश्रमात गर्दी वाढत असल्याची वस्तुस्थिती आहे. कोरोनानंतर शहरातील वृद्धाश्रम फुल्ल झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अनेक ज्येष्ठ मंडळी वृद्धाश्रमासाठी वेटिंगवर आहेत. कोरोना काळातील कुटुंबात वाढलेले कलह, आजारपण आणि कोलमडलेली आर्थिक परिस्थिती ही यामागील कारणे असल्याचे सांगितले जात आहे. आयुष्याच्या उत्तरार्धातही अनेकांच्या नशिबी फरफट आली आहे.

कोरोनाकाळात माणसं दुरावली

बाळाच्या जन्मानंतर आई-वडिलांकडून मोठ्या थाटामाटात आनंदोत्सव साजरा केला जातो. बोट धरून चालायला शिकवण्यापासून, शाळेत दाखल करण्यापासून ते मुलांच्या लग्नानंतरही त्यांची काळजी आई-वडील करत असतात. त्यांच्या इच्छा स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते आयुष्यभर झगडतात. मात्र याच आई-वडिलांच्या आयुष्यातील अखेरच्या दिवसांत त्यांना मुलांची साथ लाभत नाही. कोरोनाकाळात तर अनेकांना आई-वडिलांची अडचण झाली. दरम्यानच्या काळात वृद्धाश्रमात आपल्या पालकांच्या प्रवेशासाठी अनेक मुलांचे फोन व्यवस्थापकांना आले. मात्र संकटाच्या काळात आहे त्याच वृद्धांची काळजी घेणं आवश्यक असल्याने त्यांनी नवीन प्रवेशास तात्पुरता नकार दिला होता.

वृद्धाश्रमच आता त्यांचे ‘घर’

साठी ओलांडलेल्या अनेक ज्येष्ठ मंडळींचे वृद्धाश्रम म्हणजे सेकंड होम बनले आहे. येथे आजी-आजोबांची एकमेकांशी घट्ट मैत्री जमलीय. येथे ते वेगवेगळे खेळ खेळतात. सोबत जेवण करतात आणि एकमेकांची काळजीही घेतात. या प्रत्येकाची एक अनोखी कहाणी आहे. यामध्ये कोणी सेवानिवृत्त सरकारी अधिकारी आहे, कोणी शिक्षक, तर कोणी कंपनीत मोठ्या पदावर तर कोणी घर कुटुंब सांभाळणारी गृहिणी आहे. मात्र यांचा अखेरचा प्रवास सुरू होताच मुलांना त्यांचे ओझे वाटायला लागले. त्यामुळे काहींनी स्वतःहून घर सोडले तर काहींना इच्छा नसतानाही वृद्धाश्रमात यावे लागले आहे.

म्हातारपण नको देगा देवा!

ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य घालवले, त्यांची उतरत्या वयात काळजी घेणे मुलांचे कर्तव्य असते. अलीकडच्या काळात म्हातारी माणसे नोकरी व्यवसायामुळे व्यस्त बनलेल्या जीवनशैलीत अडचणीची ठरताहेत. त्यामुळे मुलांना त्यांच्या घरी सुखी राहू दे, पण इथे आम्ही खूश आहोत. मात्र किमान आठ दिवसांतून मुलांनी, नातवंडांनी आमच्याशी बोलावे, अशी भावनिक प्रतिक्रिया इथल्या आजी-आजोबांनी दिली. कोरोना काळात कुटुंबात वाढलेले कलह, आजारपण आणि कोलमडलेली आर्थिक परिस्थिती हे वृद्धाश्रमांतील वाढत्या संख्येचे मुख्य कारण आहे.

Back to top button