कोल्हापूर खड्ड्यांत… महापालिकेच्या नावाने नागरिकांचा शिमगा

कोल्हापूर खड्ड्यांत… महापालिकेच्या नावाने नागरिकांचा शिमगा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूर शहरातील रस्त्यावर खड्डेच खड्डे अशी स्थिती झाली आहे. त्यातच आता पावसाने शहरातील रस्त्यांची अक्षरशः वाट लावली आहे. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हाडं खिळखिळी करणार्‍या खड्ड्यांमुळे शहरवासीयांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महापालिका प्रशासनाच्या नावाने नागरिकांचा शिमगा सुरू आहे. परंतु त्याचे सोयरसुतक अधिकार्‍यांना नसल्याचे वास्तव आहे.

अधिकार्‍यांच्या वाहनाचे चालक त्यांना थोड्याफार चांगल्या असलेल्या रस्त्यावरूनच नेत असल्याने खड्ड्यांची जाणीव होत नसल्याची चर्चा आहे. अधिकार्‍यांची वाहनेही खड्ड्यातून फिरवा मग त्यांना शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था कळेल, अशी चर्चा नागरिकांतून सुरू आहे.

कोल्हापूर शहरात सुमारे सातशे किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. परंतु काही सिमेंटचे रस्ते वगळले तर डांबरी रस्ते असून नसल्यासारखी स्थिती आहे. बहुतांश रस्ते खड्ड्याने माखले आहेत. सुमारे एक फूट खोल आणि तब्बल पाच ते सात फूट लांब असे खड्डे अनेक रस्त्यावर आहेत. शहराच्या मध्यवस्तीतील रस्त्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे. वाहनामुळे खड्ड्यातील घाण पाणी अंगावर उडून अनेक ठिकाणी वादावादीच्या घटना घडत आहेत. महापालिका परिसरासह, सीपीआर, लुगडी ओळ, भाऊसिंगजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दसरा चौक, स्टेशन रोड, लक्ष्मीपुरी, संभाजीनगर, फुलेवाडी, राजारामपुरी आदी रस्त्यांतील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

महापालिकेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 89 लाख रुपयांच्या पॅचवर्कची कामे केल्याचे सांगितले, परंतु महापालिका परिसरातील काही रस्त्यांवर फक्त मोठी खडी पसरली आहे. त्यासाठी एवढी रक्कम लागली का? अशी विचारणा नागरिकांतून केली जात आहे. शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाल्याने त्याचे पॅचवर्क करणार कधी? अन्यथा नव्याने रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news