कोल्हापूर : लम्पिस्किन रोखण्यासाठी यंत्रणा एकवटली | पुढारी

कोल्हापूर : लम्पिस्किन रोखण्यासाठी यंत्रणा एकवटली

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील गायवर्गीय जनावरांमध्ये पसरलेल्या लम्पिस्किन आजाराला रोखण्यासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग सज्ज आहे. हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील जनावरांच्या दवाखान्यांमध्ये डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी जिल्ह्यातील अन्य ठिकाणांच्या पशुवैद्यकीय अधिकार्‍यांबरोबर परजिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांची प्रतिनियुक्तीवर ऑर्डर काढण्यात आली आहे. गोकुळ व वारणा दूध संघांतील पशुवैद्यकीय अधिकारी व खासगी व्यवसाय करणार्‍या जनावरांच्या डॉक्टरांचीही मदत घेण्यात येत आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी तैनात

कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या दोन स्वतंत्र यंत्रणा जिल्ह्यात कार्यरत आहेत. पशुसंवर्धन विभागाची राज्याची (स्टेट) आणि जिल्हा परिषदेची यंत्रणा आहे. तशीच यंत्रणा कृषी विभागाची देखील आहे. त्यापैकी राज्यस्तरीया कार्यालयावर पशुसंवर्धन उपायुक्तांचे नियंत्रण, तर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे कामकाज मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली चालते. जिल्ह्यात जनावरांचे 176 दवाखाने आहेत. त्यापैकी राज्यस्तरीय 37 दवाखाने आहेत. लम्पिस्किनबाधित गाय आढळल्यानंतर तातडीने या कार्यालयाने सर्वेक्षण सुरू केले. उपायुक्त कार्यालयांंतर्गत येणार्‍या या सर्व दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासाठी पुणे येथून काही वैद्यकीय अधिकार्‍यांना बोलावून घेण्यात आले आहे. कंत्राटी पद्धतीवर काही पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना मुदत संपल्यानंतर त्यांची सेवा थांबविण्यात आली होती. त्यांना पुन्हा बोलावून घेण्यात आले आहे. याशिवाय प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचीही मदत घेण्यात येत आहे.

जनावरांचे बाजार बंद

जिल्ह्यात जनावरांचे बाजार, प्रदर्शन, शर्यती यावर जिल्हाधिकार्‍यांनी बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे परराज्यातून जनावरे खरेदीवरही निर्बंध आणले आहेत.

वारणा 3 लाख डोस मोफत देणार

वारणा दूध संघाने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गायवर्गीय जनावरांना लस देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत वारणा दूध संघाने 25 हजार जनावरांना लस दिली आहे. यासाठी वारणा दूध संघाचे 50 कर्मचारी कार्यरत आहेत. वारणातर्फे 3 लाख डोस मोफत जनावरांना देण्यात येणार आहे, असे वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले

गोकुळ दूध संघाचा 500 कर्मचार्‍यांचा ताफा

लम्पिस्किनला रोखण्यासाठी गोकुळने लसीकरण सुरू केले आहे. यासाठी एक लाख डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. संघाचे डॉक्टर, रेतनसेवकांसह 505 कर्मचारी कार्यरत आहेत. गोकुळची जिल्ह्यात 30 पशुसंवर्धन विभागीय कार्यालये आहेत. या कार्यालयांमार्फत लसीकरण करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कामही या पथकाद्वारे केले जात असल्याची माहिती व्यवस्थापक (पशुसंवर्धन) यू. व्ही. मोगले यांनी दिली.

लसीचा पुरेसा साठा

जिल्ह्यात साधारणपणे अडीच ते तीन लाख गायवर्गीय जनावरे आहेत. या सर्वांना पुरेल इतकी लस सध्या जिल्ह्यात उपलब्ध आहे, असे जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पोवार यांनी सांगितले.

लसीकरण महत्त्वाचे

वारणा दूध संघाने 3 लाख, गोकुळने 1 लाख व शासनाकडून साधारणपणे 1 लाख डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. गायवर्गीय जनावरांची संख्या पाहता हे डोस पुरेसे आहेत.

लम्पिस्किनचा प्रसार होऊ नये, यासाठी पशुसवंर्धन विभागाच्या वतीने प्रभावीपणे उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी सहकारी संस्थांचीही मदत होत आहे. सर्वत्र लसीकरण सुरू आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी घाबरू नये.
– वाय. ए. पठाण, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग

जनावरांच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध घालावेत, अशा सूचना गटविकास अधिकार्‍यांना दिल्या आहेत. लम्पिस्किन साथीच्या काळात पशुसंवर्धन विभागातील कर्मचार्‍यांनी कसूर केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Back to top button