राशिवडे: पुढारी वृत्तसेवा : पब्जी गेमच्या आहारी जाऊन हर्षद कृष्णात डकरे (वय १९, रा. घानवडे, ता.करवीर) याने आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, मोबाईलचा अतिवापर कसा जीवघेणा ठरु शकतो, याचे हे उदाहरण आहे. त्याच्या यमराज आला या आय. डीची चर्चा परिसरात हाेत आहे.
हर्षद डकरे याला मोबाईलवरील पब्जी गेमचे वेड लागले होते. यमराज आला ही आय. डी. वापरणाऱ्या हर्षदचे बारावीपर्यत शिक्षण झाले होते. दोन दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडताना त्याच्या मित्रांनी त्याला घाबरलेल्या अवस्थेत पाहिले होते. ही बाब अन्य मित्रांना सांगितल्यानंतर हर्षदशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दोन तासांच्या अवधीनंतर त्याचा फोन लागला. त्याने आपण तेरसवाडीपैकी कदमवाडीच्या जंगलात असल्याचे सांगितले. त्याठिकाणी नातेवाईकांसह मित्रांनी धाव घेतली असता हर्षदने विषप्राशन केल्याचे निदर्शनास आले. तत्काळ त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये आणण्यात आले. पण त्याआधीच त्याने जगाचा निरोप घेतला होता.
हर्षदची "यमराज आला" या आय.डी.ची आता चांगलीच चर्चेत आली आहे. या आय.डी.ला २५ हजाराची मागणी आल्याची चर्चा आहे. या पैशावर तो दुबईची स्वप्ने बघत होता; पण याच पब्जीच्या नादात त्याने आपले जीवन संपवले, अशी चर्चा परिसरात आहे.
हेही वाचलंत का ?