कोल्हापूर : पंचगंगेच्या पातळीत वाढ; 36 बंधारे पाण्याखाली | पुढारी

कोल्हापूर : पंचगंगेच्या पातळीत वाढ; 36 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात सोमवारी पावसाने काहीशी उसंत घेतली. मात्र, सलग दोन दिवस झालेल्या धुवाँधार पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. सायंकाळी पंचगंगेची पातळी 27 फुटांवर गेली असून, रात्री उशिरा पाणी पात्राबाहेर पडेल, अशी शक्यता आहे. राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद झाला असून, दोन दरवाजे खुले आहेत. जिल्ह्यातील 36 बंधारे पाण्याखाली गेले असून, त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. शहरात पावसाने वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडून गेली.

दोन दिवस मुसळधार बरसणार्‍या पावसाने सोमवारी काहीशी उसंत घेतली. दुपारी काही काळ सूर्यदर्शनही झाले. सकाळी पावसाची संततधार होती. मात्र, दुपारी साडेबारानंतर पावसाने विश्रांती घेतली. पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने राधानगरी धरणाचा तिसर्‍या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी बंद झाला. धरणाचे पाच आणि सहा क्रमांकाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले असून, धरणातून एकूण 4 हजार 456 क्यूसेक विसर्ग सुरू आहे.

पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी धरणातील विसर्गामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे.
सकाळी नऊ वाजता पंचगंगेची पातळी 26 फुटांवर गेली. सायंकाळी सात वाजता पाणी पातळी 27.6 फुटांवर गेली. दिवसभरात पाणी पातळीत संथगतीने वाढ होत गेली. रात्री आठ वाजता पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडण्यास अवघे फूटभर पाणी कमी होते. यामुळे रात्री उशिरा पंचगंगा पात्राबाहेर पडेल, अशी शक्यता होती.

शहरात सकाळी आणि सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने शहरात वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. दिवसभर शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक पूर्णत: कोलमडून गेली होती. स्टेशन रोड, जिल्हाधिकारी कार्यालय, भाऊसिंगजी रोड, परीख पूल या मार्गावर वाहनांच्या रांगा होत्या. संथगतीने वाहने पुढे जात होती.

चंदगड, गगनबावडा तालुक्यांत अतिवृष्टी

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी 36.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. चंदगड (71.8 मि.मी.) आणि गगनबावडा (68.8 मि.मी.) तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. हातकणंगले तालुक्यात 13.7, शिरोळमध्ये 15.2, पन्हाळ्यात 31.4, शाहूवाडीत 41.7, राधानगरीत 46.8, करवीरमध्ये 37.8, कागलात 32.8, गडहिंग्लजमध्ये 21.6, भुदरगडमध्ये 58.9, आजरा तालुक्यात 36.3 मि.मी. पाऊस झाला.

अकरा धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

गेल्या 24 तासांत प्रमुख 15 पैकी 11 धरण क्षेत्रांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. घटप्रभा धरण परिसरात सर्वाधिक 195 मि.मी. पाऊस झाला. जांबरे परिसरात 190 मि.मी. पाऊस झाला. पाटगावात 145, कुंभीत 144, कोदेत 107, दूधगंगेत 105, वारणेत 89, चिकोत्रात 85, राधानगरीत 77, जंगमहट्टीत 75, तर कासारीच्या पाणलोट क्षेत्रात 67 मि.मी. पाऊस झाला. चित्रीत 55, तुळशीत 37, कडवीत 30, तर आंबेओहोळ परिसरात 28 मि.मी. पाऊस झाला.

कडवीवगळता सर्व धरणांतून विसर्ग

कडवी धरणवगळता उर्वरित सर्व 14 धरणांतून सकाळी आठ वाजता पाण्याचा विसर्ग सुरू होता. राधानगरीतून 4 हजार 456 क्यूसेक, पाटगावमधून 3 हजार 97 क्यूसेक, घटप्रभा धरणातून 3 हजार 993 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तुळशीतून 250, दूधगंगेतून 900, कासारीतून 550, कुंभीतून 700, चिकोत्रातून 400, चित्रीतून 270, जंगमहट्टीतून 634, जांबरेतून 70, आंबेओहोळमधून 1,018, तर कोदेतून 597 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून दुपारी 500 क्यूसेक विसर्ग सुरू केला आहे.

जिल्ह्यातील 36 बंधारे पाण्याखाली

जिल्ह्यातील 36 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. ती पर्यायी मार्गाने सुरू आहे. दोन मार्गांवरील एस.टी. वाहतूक बंद करण्यात आली आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील सरकारी कोगे, राशिवडे व हळदी, तुळशी नदीवरील बीड, कासारी नदीवरील यवलूज व ठाणे आळवे, दूधगंगा नदीवरील सिद्धनेर्ली, दत्तवाड व सुळकूड, ताम—पर्णी नदीवरील चंदगड, हल्लारवाडी, कोकरे व कुर्तनवाडी, घटप्रभा नदीवरील पिळणी, बिजूर भोगोली, कानडे सावर्डे व हिंडगाव, वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, म्हसवे, गारगोटी, कुरणी, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील निलजी, ऐनापूर, गिजवणे व साळगाव असे एकूण 36 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कळंबा, राजाराम तलाव ओव्हरफ्लो

दोन दिवसांच्या पावसाने कळंबा, राजाराम तलावासह रंकाळा तलावही पूर्ण क्षमतेने भरला होता. कळंबा, राजाराम आणि रंकाळा तलावांच्या सांडव्यातून पाणी ओव्हरफ्लो होत होते. कळंब्यासह राजाराम तलावाच्या सांडव्यावर नागरिकांची गर्दी झाली होती.

Back to top button