कोल्हापूर : प्रशासकांना मुदतवाढ; इच्छुकांची घालमेल | पुढारी

कोल्हापूर : प्रशासकांना मुदतवाढ; इच्छुकांची घालमेल

कोल्हापूर ; डी. बी. चव्हाण : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेतून पणन प्रक्रिया संस्था गट वगळण्यात आला आहे. यावेळी संचालकांच्या 19 ऐवजी 18 जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच या गटातून ज्यांनी निवडणूक लढविण्यासाठी नियोजन केले होते, त्यांना आता दुसरा गट शोधावा लागणार आहे.

बाजार समितीच्या निवडणुका पाच गटातून घेण्यात येत होत्या. त्यात सेवा सोसायटी गट, ग्रामपंचायती गट, पणन प्रक्रिया गट, अडते-व्यापारी गट आणि हमाल-तोलाईदार गट यांचा समावेश होता. पणन प्रक्रिया संस्था गटात अशा अनेक सेवा सोसायट्या होत्या की, त्यांनी प्रक्रिया संस्था म्हणूनही परवाना घेतला होता आणि सेवा संस्था म्हणूनही त्यांचा परवाना होता. यामध्ये एकाच संस्थेच्या दोन प्रतिनिधींना मतदान करण्याची संधी मिळत होती.

ही बाब चुकीची होती, तसेच प्रक्रिया संस्था या बाजार समितीच्या उत्पन्नासंबंधी कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नव्हत्या. या दोन कारणामुळे तत्कालीन शिवसेना-भाजप सरकारने बाजार समितीच्या मतदान प्रक्रियेतून पणन प्रक्रिया संस्था गट वगळण्याचा निर्णय घेतला. 2017-18 या आर्थिक वर्षापासून हा निर्णय बाजार समितींना लागू करण्यात आला. त्यानुसार समितींच्या प्रशासनाने पणन प्रक्रिया संस्था गट रद्द केला. त्यावेळी याच गटातून एक संचालक निवडून आला होता. शासनाच्या आदेशानुसार समितीने त्या संचालकाचे संचालकपद रद्द केले.

त्यानंतर आता बाजार समितींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सहकारी निवडणूक प्राधिकरणाने पणन प्रक्रिया संस्था गट वगळून सेवा सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी, हमाल या गटांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुकीमुळे जिल्ह्यात राजकीय धुमाकूळ सुरू झाला आहे. याच पद्धतीने जिल्ह्यातील तिन्ही बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत.

प्रक्रिया गट वगळल्याने शेतकरी संघ बाहेर

पणन प्रक्रिया संस्था गटात जिल्ह्यातील 360 प्रक्रिया संस्था होत्या. त्यात रवा मैदा संघ, प्रक्रिया संघ, शेतकरी संघ अशा संस्थांचा समावेश होता. पण राज्य शासनाने बाजार समिती निवडणूक प्रक्रियेतून पणन प्रक्रिया संस्था गट वगळला आहे. त्यामुळे शेतकरी संघासह अन्य प्रक्रिया संस्थांची बाजार समितीच्या मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी हुकली आहे.

Back to top button