कोल्हापूर : आदिमायेच्या उत्सवासाठी अवघा जिल्हा सज्ज | पुढारी

कोल्हापूर : आदिमायेच्या उत्सवासाठी अवघा जिल्हा सज्ज

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव संपताच सार्‍यांना वेध लागले ते शारदीय नवरात्रौत्सवाचे. पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या आदिमायेच्या उत्सवासाठी मूर्तिकारांच्या हाताला वेग आला असून सार्वजनिक उत्सव मंडळेदेखील सक्रिय झाली आहेत. एकीकडे आदिशक्तीची विविध रूपे साकारण्यासाठी सुरू असलेली मूर्तिकारांची धडपड पाहण्याजोगी ठरत असतानाच दुसरीकडे मंडप उभारण्यासाठी लागणार्‍या परवानगी प्रक्रियेसह विविध कार्यक्रमांच्या नियोजनासाठी मंडळातील कार्यकर्त्यांची पळापळ सुरू आहे.

गणेश विसर्जनानंतर दुसर्‍याच दिवशी कुंभारवाड्यात नवरात्रौत्सवासाठी दुर्गामातेच्या मूर्ती घडवण्याची लगबग सुरू झाली. जिल्ह्यातून दरवर्षी हजारोंच्या संख्येत जिल्ह्यातून परराज्यासह अन्य शहरांमध्ये मूर्ती पाठवल्या जात आहेत. सध्या या मूर्तींचे पॉलिशकाम सुरू असून पुढील पाच दिवसांत जिल्ह्यातील सार्वजनिक मंडळांच्या मागणीनुसार मूर्ती साकारल्या जाणार आहेत. मूर्तिकारांच्या हातात आता दहा-बारा दिवसांचा अवधी आहे. मात्र त्यातच आता पावसाने लावलेली जोरदार हजेरी मूर्तिकारांच्या चिंतेचे कारण बनले आहे.

बापट कॅम्प येथील 8 ते 10 कारखान्यांत नवदुर्गा मूर्ती साकारल्या जातात. प्रत्येकी एका कारखान्यात दरवर्षी कमीत कमी 100 ते दीडशे मूर्ती तयार केल्या जातात. सर्वसाधारणपणे 3 ते 8 फुटांपर्यंत नवदुर्गा मूर्ती साकारल्या जात असल्या तरी मंडळांकडून चार ते 6 फुटांच्या मूर्तींना पसंती दर्शवली जात आहे. मूर्तिकारांनी वाघ, सिंहावर, उभ्या त्याच प्रमाणे महिषासुरमर्दिनी, चंडिका, अंबिका, एकवीरा, कोल्हापूरची अंबाबाई, माहूर गडावरची रेणुका, तुळजापूरची भवानी, नाशिकची सप्तशृंगी, सरस्वती, लक्ष्मी माता या रूपातल्या मूर्ती तयार केल्या आहेत.

तीन ते आठ फुटांपर्यंत मूर्ती

शहरातील मूर्तिकारांनी तीन फुटांपासून आठ फुटांपर्यंत मूर्ती बनवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. देवीचा मुखवटा उठावदार आणि आकर्षक करण्याबरोबरच डोळ्यांमध्ये तेज साठवणे हे मूर्तिकारांचे कसब असते. मूर्ती बनवणे व त्या मूर्तीत सजीवता आणणे हे अतिशय कौशल्याचे काम असल्यामुळे दुर्गामातेच्या मूर्ती बनवताना जास्त वेळ लागतो. अलंकारिक ज्वेलरीचा साज असलेल्या व कापडी साडीच्या मूर्तींची मागणी वाढते आहे, असे मूर्तिकार संभाजी माजगावकर यांनी सांगितले.

Back to top button