कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : राजस्थान गुजरात आणि पंजाबमध्ये प्रचंड दहशत निर्माण केलेल्या राजस्थानातील कुख्यात टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी पुणे बेंगलोर महामार्गावर गुरुवारी दुपारी थरारक पाठलाग केला. किनी टोल नाका ते कोगनोळी हा जीवघेणा थरार होता. अखेर कोल्हापूर पोलिसांना कोगनोळी टोल नाक्यावर सापळा रचून पाचही गुंडांना बेड्या ठोकण्यात यश आले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण वडगाव पोलीस आणि कागल पोलिसांच्या जिगरबाज कामगिरीमुळे गुजरात राजस्थान आणि पंजाब मधील पोलिसांना चकवा देत गोव्याकडे पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे. गुजरात येथील भरतपूर मध्ये टोळीतील साथीदाराने अंधाधुंद गोळीबार करून भर दिवसा एकाची हत्या केली होती. जमीन वादातून हा प्रकार घडल्याने भरतपूरसह राज्यातील पोलीस गुन्हेगारांच्या मार्गावर होते. गुजरातप्रमाणे राजस्थान आणि पंजाबमध्ये ही पूर्वीची दहशत आहे. कुख्यात टोळीतील साथीदार पुणे बेंगलोर महामार्गावरून गोव्याकडे जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना दुपारी मिळाली. त्यांनी तत्काळ पेठवडगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण व कागल पोलिसांना सतर्कतेच्या सूचना केल्या. संपूर्ण फौज फाटा महामार्गावर तैनात करण्यात आला. वडगाव पोलिसांना चकवा देत ही टोळी महामार्गावरून कागलच्या दिशेने सुसाट झाली.
स्थानीक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजय गोरले आणि त्यांच्या पथकाने जीवघेणा पाठलाग सुरू केला. तर कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री जाधव यांनी कोगनोळी टोल नाक्यावरील सर्व मार्ग बंद करून गोव्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या गुंडांच्या वाहनाला घेरले. पोलिसांनी एकाच वेळी गुंडांना गराडा घालून त्यांच्या मुसक्या आवळल्या. मोठ्या पोलीस बंदोबस्त पाचही गुंडांना पोलीस मुख्यालयात आणण्यात आले आहे. सायंकाळपर्यंत त्यांची कसून चौकशी सुरू होती.