कोल्हापूर : गंगावेसमधून पंचगंगेकडे ‘नो एंट्री’

कोल्हापूर : गंगावेसमधून पंचगंगेकडे ‘नो एंट्री’
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रशासनाने मिरजकर तिकटी, बिनखांबी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेस असा पारंपरिक मार्ग कायम ठेवला आहे. परंतु जिल्हा पोलिस दलाच्या सूचनेनुसार गंगावेशपासून पंचगंगा नदीकडे जाणारा मार्ग महापालिकेच्या वतीने बॅरिकेडस् लावून अडविण्यात येणार आहे. परिणामी गंगावेसपासून पंचगंगेकडे यंदा 'नो एंट्री' असेल. रंकाळामार्गे इराणी खणीकडे मूर्ती विसर्जनासाठी मार्ग राहणार आहे. पंचगंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जनासाठी बंदी असेल, असे महापालिका अधिकार्‍यांनी सांगितले.

1300 अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर

महापालिकेने सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पवडी विभागाचे 225 कर्मचारी, आरोग्य व ड्रेनेज विभागाचे 650 व इतर विभागांचे कर्मचारी, 430 हमालांसह 90 टेम्पो, 10 डंपर, 24 ट्रॅक्टर ट्रॉली व 5 जे. सी. बी., 7 पाण्याचे टँकर, 2 रोलर, 2 बुम अशी यंत्रणा सज्ज्य करण्यात आली आहे. मिरवणूक मार्गावरील सर्व रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. निश्‍चित केलेल्या विसर्जन मार्गावर लाकडी व मजबूत बांबूचे व आवश्यकतेनुसार लोखंडी बॅरिकेडस् व वॉच टॉवर उभी करण्यात येणार आहेत. इराणी खणीवर सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी दोन जे. सी. बी.ची व्यवस्था करण्यात आली आहे.

वॉच टॉवरसह सीसीटीव्ही कॅमेरे

विसर्जन मार्गावरील सर्व अडथळे व अतिक्रमण काढण्यात आली आहे. मिरवणूक मार्गावरील अडथळा ठरत असलेल्या झाडांच्या फांद्याही छाटल्या आहेत. मिरवणूक मार्ग व विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. पंचगंगा नदी घाट, राजाराम तलाव, कोटीतीर्थ तलाव, पंचगंगा नदी बापट कॅम्प येथे अर्पण करण्यात येणार्‍या गणेशमूर्ती संकलनासाठी मंडप उभारण्यात आलेला आहे. इराणी व बाजूच्या खणीभोवती संरक्षणासाठी बॅरिकेडस् लावण्यात आले असून वॉच टॉवर व पोलिसांसाठी पेंडल उभे करण्यात आले आहे. इराणी खण येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

मिरवणूक पाहण्यासाठी धोकादायक इमारतीत जाऊ नका

आरोग्य विभागाकडून विर्सजन मिरवणूक मार्ग, विसर्जन स्थळ ठिकाणी साफसफाई करण्यात आली असून वैद्यकीय पथके नेमली आहे. अर्पण केलेल्या गणेशमूर्ती व निर्माल्य योग्य त्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी वाहतूक व्यवस्था व कर्मचारी नेमण्यात आले आहेत. विसर्जन मार्गावरील धोकादायक इमारतीभोवती बॅरिकेडस् उभारण्यात येत आहेत. तसेच या इमारतीजवळ धोकादायक असलेचे फलक लावण्यात येत आहेत. नागरिकांनी अशा इमारतीच्या परिसरात अगर इमारतीमध्ये प्रवेश करू नये, असेही आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पापाची तिकटीला महापालिकेसह विविध राजकीय पक्षांचे मंडप

अनंत चतुर्दशीला कोल्हापुरात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण असते. हजारावर मंडळे मिरवणुकीत सहभागी होतात. त्यांच्यासाठी महापालिका प्रशासनासह विविध राजकीय पक्ष ठिकठिकाणी पानसुपारी देण्याचा कार्यक्रम ठेवत असतात. यंदाही महापालिकेच्या वतीने शुक्रवारी पापाची तिकटी येथेच मंडप घालण्यात येणार आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते शुक्रवारी मंडळांच्या पदाधिकार्‍यांना श्रीफळ, पान-सुपारी, रोप भेट देण्यात येणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह राजकीय पक्ष, विविध संघटना यांच्या वतीने मंडप घातले जातात.

अग्‍निशमन दल यंत्रणा सतर्क.

अग्‍निशमन विभागामार्फत विसर्जन ठिकाणी अग्‍निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड आवश्यक त्या साधनसामुग्रीसह तैनात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व सार्वजनिक मंडळांनी गणेशमूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीमध्ये न करता इराणी खणीमध्ये करुन महापालिकेस सहकार्य करावे. तसेच विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध करावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news