कोल्हापूर : साखर कारखान्यांकडे 7 लाख टन साठा | पुढारी

कोल्हापूर : साखर कारखान्यांकडे 7 लाख टन साठा

कोल्हापूर ; डी. बी. चव्हाण : यंदा साखर कारखान्यांना साखर निर्यातीला संधी मिळाल्याने कारखान्यांकडील साखरेचा साठा गतवर्षीच्या तुलनेत 1 लाख टनाने कमी झाला आहे. सध्या कोल्हापूर विभागातील कारखान्यांकडे 7 लाख टन साखर शिल्‍लक आहे. गतवर्षी हाच आकडा 10 लाख टनांपेक्षा अधिक होता.

यंदा हंगामात कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांतील 36 साखर कारखान्यांमध्ये 29 लाख टन साखर उत्पादित झाली होती. त्यात मागील हंगामातील 8 लाख टन साखर शिल्‍लक होती. म्हणजेच एकूण 30 लाख टन साखर विभागातील साखर कारखान्यांकडे शिल्‍लक होती. या साखरेच्या विक्रीसाठी कारखान्यांना ग्राहक शोधावे लागत होते; पण उत्तर प्रदेशातील कारखान्यांनी साखर विक्रीमध्ये घेतलेल्या आक्रमक धोरणाचा फटका येथील कारखानदारांना बसत होता.

केंद्राकडून निर्यातीला चालना

साखर विक्रीवरच साखर कारखान्यांचे अर्थकारण चालत असल्याने केंद्र सरकारने साखर विक्री झाल्याशिवाय कारखाने शेतकर्‍यांना पैसे देऊ शकत नाहीत, ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने साखर निर्यातीवरील निर्बंध उठवले होते. त्यामुळे कारखान्यांनी जास्तीत जास्त साखर निर्यात केली. देशातील साखर कारखान्यांनी 110 लाख टन साखरेची निर्यात केली आहे. महाराष्ट्रातील कारखान्यांनी स्थानिक बाजारपेठेसह ईशान्यकडील राज्यांना साखर विक्री केली. त्यामुळे कारखान्यांकडील साखर साठा कमी झाला आहे.

साखर निर्यातीसाठी सर्वच कारखान्यांना संधी असतानाही काही कारखान्यांच्या संचालक मंडळांनी तातडीने निर्णय न घेतल्याने साखर शिल्‍लक राहिली आहे. त्याचा फटका एफआरपी देण्यावर होत आहे.

Back to top button