कोल्हापूर : पानसरे खटल्याची सुनावणी कोल्हापुरात व्हावी – ‘एटीएस’चा सरकारला प्रस्ताव | पुढारी

कोल्हापूर : पानसरे खटल्याची सुनावणी कोल्हापुरात व्हावी - ‘एटीएस’चा सरकारला प्रस्ताव

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाचे युनिट व कार्यक्षेत्र सोलापुरात असले, तरी कॉ. गोविंद पानसरे खून खटल्यातील साक्षीदार, पंचांचे वास्तव्य कोल्हापूर जिल्ह्यात आहे. या सर्वांना न्यायालयीन कामकाजासाठी सोलापूरला हजर राहणेे जोखमीचे आहे. त्यामुळे पानसरे खून खटला कोल्हापूर येथील न्यायालयात चालविण्याबाबतचा प्रस्ताव ‘एटीएस’ने राज्य शासनाला सादर केला आहे. त्याबाबतचा अहवालही वरिष्ठ अधिकार्‍यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाला मंगळवारी सादर केला.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. खटल्याचा तपास ‘एसआयटी’कडून ‘एटीएस’कडे सोपविण्यात आला आहे. दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाचे अधीक्षक तुषार दोषी यांच्यासह ‘एसआयटी’चे तत्कालीन तपास अधिकारी व अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शिवाजीराव राणे न्यायालयात उपस्थित होते. सोलापूर येथील
न्यायालयात हा खटला चालविण्याऐवजी कोल्हापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्याबाबत ‘एटीएस’ने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविल्याचे ‘एटीएस’चे पोलिस अधीक्षक दोषी यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसा अहवालही विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांच्यामार्फत न्या. तांबे यांच्याकडे सादर करण्यात आला.

12 आरोपींविरुद्ध एकूण 5 दोषारोपपत्रे

पानसरे खून खटल्यातील सर्व साक्षीदार, पंच कोल्हापूर शहर व परिसरातील आहेत. दहशतवादविरोधी पथकाचे कार्यक्षेत्र सोलापुरात आहे. त्यामुळे हा खटला सोलापूर येथील जिल्हा न्यायाधीश (3) व अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश यांच्यासमोर चालविणे अपेक्षित आहे. या खटल्यात 12 आरोपींविरुद्ध 5 दोषारोपपत्रे विशेष तपास पथकाने कोल्हापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केली आहेत.
हा खटला कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात चालू ठेवण्याबाबत राज्य सरकारला प्रस्ताव सादर केल्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. राणे व पोलिस अधीक्षक दोषी यांनी युक्‍तिवाद करताना सांगितले. या प्रस्तावावर शासनस्तरावर लवकरच निर्णय होईल, असेही ते म्हणाले. पुढील सुनावणी 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. पानसरे खून खटल्याचा तपास ‘एटीएस’कडे सोपवण्यात आल्याने पथकाचे पोलिस अधीक्षक दोषी हे आज, मंगळवारी कोल्हापूरमध्ये आले होते.

समीरची हजेरी कोल्हापुरातच

पानसरे खून खटल्यातील जामिनावर सोडण्यात आलेला संशयित समीर गायकवाड (रा. सांगली) याच्या हजेरीचा मुद्दा आरोपीचे वकील अ‍ॅड. प्रीती पाटील यांनी उपस्थित केला. गुन्ह्याचा तपास ‘एसआयटी’कडून ‘एटीएस’कडे सोपविण्यात आल्याने समीर गायकवाड याने प्रत्येक रविवारची हजेरी कोठे द्यायची, याकडे लक्ष वेधले. यावर अ‍ॅड. राणे यांनी ‘एटीएस’ अधिकार्‍यांशी चर्चा करून पुढील सुनावणीपर्यंत ‘एसआयटी’मध्येच हजेरी द्यावी, अशी विनंती केली. न्यायाधीश तांबे यांनीही पुढील सुनावणीपर्यंत कोल्हापूर येथे हजेरी द्यावी, असे निर्देश दिले.

Back to top button