कोल्हापूर : कोल्हापूरसह जयसिंगपूर, गडहिंग्लज बाजार समित्यांचा बिगुल | पुढारी

कोल्हापूर : कोल्हापूरसह जयसिंगपूर, गडहिंग्लज बाजार समित्यांचा बिगुल

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूर शेती उत्पन्‍न बाजार समितीसह जिल्ह्यातील गडहिंग्लज व जयसिंगपूर बाजार समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दि. 29 जानेवारी 2023 रोजी मतदान होईल. त्यासाठी मतदारयादी तयार करण्याचे काम बुधवार (दि. 7) पासून सुरू होणार आहे. या निवडणुका जुन्या नियमानुसार घेण्यात येणार असल्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत.

लॉकडाऊनमुळे निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. ऑक्टोेबर 2021 मध्ये बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. तेव्हा मराठवाड्यातील काही सेवा संस्थांच्या संचालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये विकास संस्थांच्या निवडणुकांनंतरच बाजार समित्यांच्या निवडणुका घ्या, अशी मागणी केली होती. न्यायालयाने विकास संस्थांच्या निवडणुका घेऊनच बाजार समित्यांच्या निवडणुका घ्या, असे आदेश दिले होते. यामुळे ही प्रक्रिया थांबली होती. सध्या राज्यातील विकास सेवा संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण होत आली आहे. दरम्यान, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने बाजार समित्यांच्या निवडणुका या खातेदार सभासदांतून घेण्यात येतील, असे सूचित केले होते. त्यामुळे शेतकर्‍यांत संभ—म निर्माण झाला होता. सहकारी निवडणूक प्राधिकरणाने काढलेल्या आदेशात विकास संस्थांचे संचालक व ग्रामपंचायतींचे सदस्य यांच्यातून मतदार घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उद्यापासून मतदारयादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

कोल्हापूर बाजार समितीचे कार्यक्षेत्र शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, राधानगरी, भुदरगड आणि कागल तालुक्यातील अर्धा भाग असे साडेसहा तालुक्यांचे आहे. यामधील 1 हजार 280 सोसायट्यांमधील सुमारे 13 हजार संचालक हे मतदार आहेत, तर 650 ग्रामपंचायतींचे 5 हजार 500 सदस्य मतदार आहेत. याशिवाय व्यापारी, अडते, हमाल, तोलाईदार असे तीन हजार मतदार आहेत.
गडहिंग्लज बाजार समितीचे गडहिंग्लज, आजरा, चंदगड या तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. तर जयसिंगपूर बाजार समितीचे शिरोळ तालुका हे कार्यक्षेत्र आहे.

निवडणूक कार्यक्रम असा…

गटविकास अधिकार्‍यांकडून सदस्य सूची मागविणे : 27 सप्टेंबर 2022
प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध : 14 नोव्हेंबर
मतदारयादीवर हरकती : 23 नोव्हेंबर
हरकतीवर सुनावणी व निर्णय घेणे : 2 डिसेंबर
अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करणे : 7 डिसेंबर
उमेदवारी अर्ज दाखल करणे : 23 ते 29 डिसेंबर
उमेदवारी अर्जांची छाननी : 30 डिसेंबर
उमेदवारी अर्ज माघार घेणे : 16 जानेवारी 2023 पर्यंत
चिन्ह वाटप : 17 जानेवारी
मतदान : 29 जानेवारी 2023
मतमोजणी : 30 जानेवारी

Back to top button