कोल्हापूर : विसर्जन मुख्य मिरवणूक मार्गासाठी ड्रॉ | पुढारी

कोल्हापूर : विसर्जन मुख्य मिरवणूक मार्गासाठी ड्रॉ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  विसर्जन मिरवणुकीवेळी महाद्वार रोडवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पारंपरिक मिरवणूक मार्ग असणार्‍या महाद्वार रोडबरोबरच उमा टॉकिज, कॉमर्स कॉलेज, बिंदू चौक, शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेस ते रंकाळा टॉवर हा दुसरा, तर टायटन चौक, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, हॉकी स्टेडियम, क्रशर चौक, इराणी खण असा तिसरा पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. महाद्वार रोडवरून जाण्यासाठी ड्रॉच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी सांगितले. शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले. सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीबाबत पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवारी शाहू स्मारक येथे पार पडली.

इराणी खणीतच विसर्जन

यापूर्वीप्रमाणे सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीसाठीही मंडळांचे सहकार्य अपेक्षित आहे. यंदा पंचगंगा नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार नाही. इराणी खणीमध्येच गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. मिरवणुकीसाठी पारंपरिक असणारा महाद्वार रोड हा सुरूच राहणार आहे; पण या मार्गावर दरवर्षी गर्दी होते. यात चेंगराचेंगरी होते आणि त्याचा पोलिस प्रशासनावर ताण असतो, असेही बलकवडे म्हणाले.

पर्यायी मार्ग तयार

दोन वर्षांनी मिरवणुकीत सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याने कार्यकर्त्यांत उत्साह आहे. आपला देखावा सर्वांनी पाहावा किंवा साऊंड सिस्टीमवर सर्वांनी थिरकावे, अशी अपेक्षा असल्याचे सांगून बलकवडे म्हणाले, महाद्वार रोड हा सर्वच मंडळांचा पसंतीचा मार्ग असतो; पण सर्वच मंडळांना मोक्याच्या वेळी महाद्वार रोडवर जाता येत नाही. त्यामुळे अनेक मंडळांनी आम्हाला पर्यायी मार्ग द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार टायटन चौक, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर, क्रशर चौकमार्गे इराणी खणीत गणेशमूर्ती विसर्जनाचा पर्यायी मार्ग तयार केला आहे. या मार्गावरून शहरातील प्रमुख मंडळांनी मिरवणुका नेल्यास भाविकांची गर्दी या मार्गावर होणार असून, महाद्वार रोडवरील गर्दीचा ताण कमी होणार आहे. पुण्यासारख्या शहरातही मिरवणुकीचे चार पर्यायी मार्ग आहेत. कोल्हापुरात या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यात यावा; पण यासाठी कोणत्याही मंडळांवर सक्‍ती केली जाणार नाही.

…तर लकी ड्रॉ काढणार

पर्यायी मार्गावरून जाण्याचा निर्णय मंडळांनी घ्यायचा आहे. आपल्या हद्दीतील पोलिस ठाण्यात मंडळांनी कोणत्या मार्गावरून मिरवणूक जाणार त्याची माहिती द्यावी. पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग हा खासबाग मैदान-मिरजकर तिकटी-बिनखांबी गणेश मंदिर-महाद्वार रोड-पापाची तिकटी, गंगावेस, रंकाळा टॉवर-क्रशर चौक, इराणी खण असा आहे. याच मार्गावरून जर मंडळांचा जाण्याचा आग्रह असेल, तर ड्रॉद्वारे त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन याचे नियोजन केले जाईल, असे बलकवडे यांनी सांगितले.

पर्यायी मार्गासाठी सक्‍ती नको

पोलिसांनी कोणत्याही मंडळांवर पर्यायी मार्गाने जाण्यासाठी सक्‍ती करू नये. राजारामपुरीत गणेश आगमन मिरवणुकीचे चांगले नियोजन झाले. पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची मुभाही मंडळांना असावी, असे आर. के. पोवार म्हणाले. रविकिरण इंगवले यांनी, गणेश विसर्जनात राजकीय वाद विकोपाला जातात. यातून अनेक निरपराधांवर गुन्हे दाखल होतात. मिरवणूक काळात पोलिस प्रशासनाने कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करताना शहानिशा करावी, असे सांगितले. बाबा पार्टे यांनी, गंगावेसपर्यंतच साऊंड सिस्टीमला परवानगी का, असा सवाल उपस्थित केला. गंगावेस ते इराणी खण हे दोन किलोमीटरचे अंतर आहे. याबाबत फेरविचार व्हावा, असे सांगितले. यावेळी ताराबाई रोड मिरवणूक मार्गाच्या प्रश्‍नावरून काही कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. दरम्यान, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बलकवडे यांनी कोणत्याही मंडळांवर चुकीची कारवाई होणार नाही. यापूर्वी कोल्हापुरात लाठीमुक्‍त मिरवणुकीचा उपक्रम राबवला गेला. यावेळी आमच्या हातात लाठी असेल तर ती उगारली जाणार नाही, असे सांगितले.

‘त्या’ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा

मिरवणुकीत चुकीचे वागणार्‍या व धिंगाणा घालणार्‍या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावेत तसेच जे यांना सोडा म्हणून सांगायला येतात त्यांच्यावरही कारवाई करा, असे बंडा साळोखे यांनी सांगितले. बाबा पार्टे यांनी दारू विक्री करणार्‍या दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे तसेच राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ईश्‍वर ओमासे, शाहूपुरीचे राजेश गवळी, लक्ष्मीपुरीचे संतोष जाधव व राजवाडाचे दत्तात्रय नाळे, वाहतूक शाखेचे स्नेहा गिरी, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत व मंडळाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

असे आहेत दोन पर्यायी मार्ग…

उमा टॉकिज-कॉमर्स कॉलेज-बिंदू चौक- शिवाजी चौक-पापाची तिकटी-गंगावेस-रंकाळा टॉवर ते क्रशर चौक असा एक मार्ग आहे.
दुसरा पर्यायी मार्ग हा सावित्रीबाई फुले हॉस्पिटल-गोखले कॉलेज-हॉकी स्टेडियम रोड-संभाजीनगर
चौक-क्रशर चौक असा आहे.

सर्वच गणेश मंडळांनी नियम पाळावेत

गणेश विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांनी साऊंड सिस्टीमचे नियम पाळावेत. रात्री नो सायलेंट झोन तसेच हॉस्पिटल व धोकादायक इमारतींजवळ साऊंड सिस्टीमचा आवाज कमी करावा. जशी गणेश आगमन मिरवणुकीत 12 नंतर साऊंड सिस्टीम बंद करण्यात आली तशीच गणेश विसर्जन मिरवणुकीत 12 नंतर साऊंड सिस्टीम बंद करण्याचे आवाहन जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांनी केले.

साऊंड सिस्टीम गंगावेसपर्यंतच

महाद्वार रोडवरील मिरवणुकीत साऊंड सिस्टीम लावून जी मंडळे सहभागी होतील त्यांच्या साऊंड सिस्टीमला गंगावेसपर्यंत परवानगी असेल. तेथून पुढे इराणी खणीपर्यंत फक्‍त मंडळांची गणेशमूर्ती व कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांचे सजीव देखावे, काही प्रतिकृती तसेच लेझीम, झांज पथके आहेत त्यांना इराणी खणीपर्यंत जाण्यास परवानगी देणार असल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

Back to top button