मेघोली तलाव अडीच तासांत रिकामा झाला; परिसरात अद्यापही भीतीचे वातावरण | पुढारी

मेघोली तलाव अडीच तासांत रिकामा झाला; परिसरात अद्यापही भीतीचे वातावरण

गारगोटी/कडगाव : पुढारी वृत्तसेवा

मेघोली लघू पाटबंधारे तलाव बुधवारी रात्री फुटून केवळ अडीच तासांत पाणी वाहून जाऊन तलाव रिकामा झाला आहे. तलावातील पाण्याने पूरस्थिती निर्माण होऊन नवले येथील जिजाबाई धनाजी मोहिते यांचा बुडून अंत झाला. यासह आठ जनावरांचाही मृत्यू झाला. पाण्याच्या प्रचंड मोठ्या प्रवाहामुळे शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. परिसरात अद्यापही घबराटीचे वातावरण आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभर आ. प्रकाश आबिटकर, माजी आ. के. पी. पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, तहसीलदार अश्विनी अडसूळ, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांच्यासह विविध अधिकारी, लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

1996 साली या तलावाच्या कामाला सुरुवात झाली. या कामासाठी सुमारे 4 कोटी 70 लाख रुपये खर्च झाले. सन 2000 साली या तलावात प्रथम पाणीसाठा करण्यात आला. दरवर्षी 98 द.ल.घ. फूट पाणीसाठा केला जात होता. निकृष्ट कामामुळे सुरुवातीपासूनच तलावाला गळती लागली होती. गळती काढावी, यासाठी परिसरातील शेतकर्‍यांनी वारंवार मागणी केली होती. माजी सभापती कीर्ती देसाई यांनीही पंचायत समिती मासिक सभेमध्ये वेळोवेळी दुरुस्तीची मागणी केली होती.

गतवर्षी आमदार प्रकाश आबिटकर, बाबा नांदेकर यांनी अधिकार्‍यांसमवेत तलावस्थळी भेट देऊन पाहणी केली होती. दुरुस्तीचा प्रस्तावही नाशिक येथे पाठविण्यात आला होता. मात्र, दुरुस्तीसाठी ठोस उपाययोजना केली गेली नाही. त्याचा परिणाम होऊन बुधवारी रात्री 10.15 च्या सुमारास प्रचंड मोठा आवाज होऊन हा तलाव पाणी सोडण्यात येत असलेल्या व्हॉल्व्हच्या दोन्ही बाजूने तळापासून 50 मीटर लांब फुटला आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा धरणाच्या खालील बाजूने जाऊन एकच हाहाकार उडाला.

पाण्याचा आवाज प्रथम धनगरवाड्यावर राहणार्‍या ग्रामस्थांच्या लक्षात आला. त्यांनी मेघोली गावात याची माहिती दिली आणि एकच गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी आमदार आबिटकर व शासकीय अधिकार्‍यांना याची माहिती दिली. पाण्याचा प्रचंड मोठ्या प्रवाहात झाडे व विद्युतखांब कोसळल्याने या परिसरात अंधाराचे साम—ाज्य पसरले, काही तासात होत्याचे नव्हते झाले. तलाव फुटल्याची बातमी परिसरात वार्‍यासारखी समजली आणि घबराट पसरली. भीतीने लोक सैरभैर झाले. अनेकांनी अख्खी रात्र जागून काढली. दरम्यान, मेघोली, वेंगरूळ, ममदापूर, तळकरवाडी, सोनुर्ली या गावांना अधिकार्‍यांनी याबाबतची माहिती देऊन सतर्क केले. नवले येथील धनाजी मोहिते, त्यांची पत्नी जिजाबाई, मुलगा नामदेव ओढ्याशेजारील जनावरांच्या गोठ्यात जनावरे सोडण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याच्या प्रवाहात जिजाबाई वाहून जाऊन त्यांचा मृत्यू झाला. तीनशे फूट अंतरावर झाडाच्या उघड्या पडलेल्या मुळात अडकलेला त्यांचा मृतदेह सापडला. तर मुलगा नामदेव मोहिते झाडांचा आधार घेत बचावला. त्यांच्या चार जनावरांचा अद्याप शोध लागलेला नाही. निवृत्ती शिवा मोहिते यांच्या जनावरांच्या गोठ्यातील तीन म्हशी व दोन बैल, दोन रेडके मात्र बुडून दगावली. याबरोबरच चार मोटारसायकली वाहून गेल्या आहेत.

मोठी जीवितहानी टळली

धरण दिवसा फुटले असते तर शेतात कामाला गेलेले अनेक ग्रामस्थ व जनावरे या धरणाच्या पाण्यात वाहून गेले असते आणि शेकडोच्या
घरात जीवितहानी झाली असती; पण अनर्थ टळला, अशी चर्चा आहे.

चारजण सुदैवाने बचावले!

जनावरांना वाचविण्यासाठी गेलेले सचिन पाटील, संतोष पाटील, प्रवीण विश्वास पाटील, भाऊ रामचंद्र पाटील, नामदेव मोहिते हे पुराच्या पाण्यात अडकले होते. झाडांचा, विजेच्या तारांचा आधार घेत सुदैवाने ते बचावले.

शेणगावपर्यंत पाणी शिरले

अचानक ओढ्याच्या व वेदगंगा नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे तलाव परिसरासह नदीकाठावरील गावांतील नागरिक भयभीत झाले. शेणगावातही रात्री उशिरा पाणी शिरले. त्यामुळे किरकोळ नुकसान झाले.

जलसंपदा विभागाकडून चौकशी : जिल्हाधिकारी

कोल्हापूर : मेघोली लघू पाटबंधारे प्रकल्प फुटी प्रकरणी जलसंपदा विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी सांगितले.

रेखावार यांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा व ग्रामस्थांशी संवाद साधला. गेल्या चार वर्षांपासून या प्रकल्पाला गळती सुरू होती, असे ग्रामस्थांचे म्हणणे असल्याचेही त्यांनी सांगितले. अधीक्षक अभियंता चौकशी करणार आहेत. ती चौकशी सखोल होईल. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यामागील नेमके कारण स्पष्ट होईल आणि त्यानंतर पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे रेखावार यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाचे अन्य बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. सांडव्यावरूनही पाण्याचा विसर्ग योग्य पद्धतीने सुरू होता, असे सांगत पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर सर्वच प्रकल्पांची तपासणी जलसंपदा विभागाकडून होत असते. या प्रकल्पाबाबत नेमके काय झाले, ते अहवाल सादर झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button