कोल्हापूर जिल्ह्यातील चार धरणांना गळतीचा धोका; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पाटगाव प्रकल्पाचे छायाचित्र.
पाटगाव प्रकल्पाचे छायाचित्र.
Published on
Updated on

कोल्हापूर जिल्ह्यातील आठ केटीवेअरची दुरवस्था झाली असून चार छोट्या धरणांना गळतीचे ग्रहण लागले आहे. धरणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या चारपैकी मेघोली तलाव फुटल्याने या धरणांच्या दुरुस्तीचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाटबंधारे विभागाने दुरुस्तीसाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात लघुपाटबंधारे प्रकल्प 55, मध्यम धरणे 10 आणि मोठी चार अशी एकूण 69 लहान-मोठी धरणे आहेत, तर तब्बल 340 केटीवेअर आहेत. पाटबंधारे विभागाने नुकत्याच केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील सात केटीवेअरची अवस्था गंभीर बनली आहे. या केटीवेअरची तातडीने दुरुस्ती आवश्यक आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील चार धरणांच्या सांडव्यांसह मुख्य दरवाजाजवळ मोठ्या प्रमाणात गळती असल्याने या धरणांचा धोका वाढला आहे. या चारपैकी मेघोली धरणाचाही या धोकादायक धरणांत समावेश आहे. पाटगाव धरणाच्या दरवाजातून मोठ्या प्रमाणात गळती होते. अशीच अवस्था मेघोली धरणाची होती. मेघोली धरणास सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. मुख्य दरवाजातून आणि धरणाच्या पायातून गळती सुरू राहिल्याने धरणास धोका निर्माण होऊन तलाव फुटला.

येणेचवंडी लघू पाटबंधारे तलावाची अवस्थाही बिकट आहे. या तलावाच्या बंधार्‍यांच्या भिंतींना गळती सुरू आहे. धरणाच्या भिंतीतून पाणी झिरपत असल्याने धोका वाढला आहे. फये लघुपाटबंधारे तलावाचा धोका कायम आहे. या तलावाच्या धरण आणि मुख्य दरवाजातून पाण्याची गळती होते. ही गळती तातडीने काढली नाही, तर धरणाचा धोका वाढणार आहे.

कोते, बीड, पनोरे, मांगले सावर्डे, शिरगाव, दत्तवाड, कडवी या केटीवेअरचे बरगे खराब झाले आहेत. काही ठिकाणी केटीवेअरच्या भिंतींना तडे गेले आहेत. बरगे खराब होऊन भिंतींना तडे गेल्याने केटीवेअर धोकादायक बनले आहेत.

मेघोलीसह 16 तलाव दुरुस्तीस निधी मंजूर

कोल्हापूर : सुनील सकटे
भुदरगड तालुक्यातील मेघोली लघुपाटबंधारे तलाव फुटल्याने जिल्ह्यातील लघुपाटबंधारे तलावांसह केटीवेअर दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मेघोलीसह 16 ल. पा. तलावांसह 28 पाटबंधारे प्रकल्पांसाठी तब्बल 48 कोटी 88 लाख 33 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

दुरुस्तीसाठी निधीस जुलै 2021 मध्ये मंजुरी मिळाली असून पावसाळ्यानंतर प्रकल्पनिहाय अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रक्रियेद्वदारे दुरुस्तीचे कामे केली जाणार आहेत. मेघोली तलावाच्या धरण सुरक्षिततेच्या कामांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या तलावाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यापूर्वीच तलाव फुटण्याची घटना घडल्याने पाटबंधारे विभागात खळबळ उडाली आहे. 48 कोटी 88 लाख 33 हजार रुपयांच्या निधीतून धरण देखभाल, सुरक्षितता, बंधारा दुरुस्ती, धडक मोहीम, कालवा दुरुस्ती आणि इतर कामे केली जाणार आहेत.

जिल्ह्यात लघुपाटबंधारे प्रकल्प 55, मध्यम प्रकल्प दहा, मोठी धरणे चार असे एकूण 69 प्रकल्प आणि 340 केटीवेअर आहेत. यापैकी 16 लघुपाटबंधारे प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले होते. हे सर्व प्रस्ताव मंजूर झाले आहेत. कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तरअंतर्गत धरण देखभाल, दुरुस्तीच्या दहा कामांसाठी दोन कोटी 27 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कोल्हापूर पाटबंधारे उत्तरमधील एकूण 64 कामांसाठी 14 कोटी 36 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला.

कोल्हापूर पाटबंधारे दक्षिण अंतर्गत एकूण 65 कामांसाठी 23 कोटी 77 लाख 23 हजार रुपये मंजूर झाले आहेत.

तज्ज्ञांचा सल्ला घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना : अधीक्षक अभियंता

मेघोली प्रकल्पाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव नुकताच मंजूर झाला आहे. पावसाळ्यामुळे काम सुरू केले नाही. सध्या हा तलाव फुटला आहे. पाटबंधारे विभागाच्या नाशिक येथील धरण सुरक्षितता संघटना आणि मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना यांच्या तज्ज्ञांतर्फे तलावाची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाणार आहेत, असे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news