कोल्हापूर : जुन्या चुका भोवल्या; सरकारी नोकरीचे स्वप्न भंगले | पुढारी

कोल्हापूर : जुन्या चुका भोवल्या; सरकारी नोकरीचे स्वप्न भंगले

कोल्हापूर ; अनिल देशमुख : एकादी छोटीशी चूकही महागात पडू शकते, एखादी वाईट संगतही सर्वनाशाकडे नेऊ शकते, अशा काही चुकांतून, वाईट संगतीमुळे हातातून गुन्हे घडले, त्याचा भार घेऊन जगतानाच चांगल्या नोकरीने हात पुढे केला. मात्र, यापूर्वीच्याच चूका करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी कारणीभूत ठरल्या. गुन्हा नोंद असल्याने सहा पैकी चौघांना नोकरीसाठी अपात्र ठरविण्यात आले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय सेवेत नियुक्‍त झालेल्या उमेदवारांसाठी असलेल्या चारित्र्य पडताळणी समितीची बैठक झाली. या बैठकीत सहा उमेदवारांची प्रकरणे समोर ठेवण्यात आली. प्रत्येक प्रकरण तपशीलवार तपासण्यात आले आणि या सहापैकी चार जणांना समितीने नोकरीसाठी अपात्र ठरवले. एकाला न्यायालयाच्या निकालाला अधीन राहून पात्र ठरवण्यात आले तर एका उमेदवारांबाबत पुढील बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे या दोघांवरही टांगती तलवार कायम आहे.

यशाचा पाया त्याच्या तारुण्यातच रोवला जातो. अशावेळी जर त्याने चांगले आचरण, मेहनत आणि प्रामाणिकपणाने काम केले तर आयुष्यभर यश मिळत राहते. परंतु, तारुण्यात झालेल्या चुका काही लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. अशा चुका या तरुणांकडूनही झाल्या आहेत. हत्यार बाळगणे, धमकावणे, हत्येचा प्रयत्न, सार्वजनिक ठिकाणी अश्‍लील प्रकार, धार्मिक तेढ निर्माण करणे, भावना दुखावणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, जुगार आदी विविध प्रकारचे गुन्हे या नोकरी मिळालेल्या तरुणांवर दाखल आहेत.

संबंधित बातम्या

सहापैकी एका तरुणाला शासकीय मुद्रणालयात तर उर्वरित पाच जणांना कोल्हापूर महापालिकेत नोकरी मिळाली होती. शासकीय मुद्रणालयात नोकरी मिळालेल्या उमेदवारांबाबत पुढील बैठकीत निर्णय होणार आहे. उर्वरित पाच पैकी चौघांना नोकरीसाठी अपात्र ठरविण्यात आले. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा नोंद असलेल्या एकाला पात्र ठरवले; मात्र हा निर्णय न्यायालयाच्या अंतिम आदेशास अधिन राहून असेल, असेही समितीने स्पष्ट केले आहे. यामुळे या दोघांवरही तशी टांगती तलवारच आहे.

Back to top button