कोल्हापूर; सचिन टिपकुर्ले : टपाल खात्याने सुरू केलेल्या अपघात विमा योजनेला कोल्हापूर जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या दीड महिन्यात 27 हजार नागरिकांनी 1 कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे. ग्रामीण भागातूनही या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
भारतीय टपाल खाते अगदी स्वस्तात विमा कवच पुरविणार आहे. अवघ्या 299 आणि 399 च्या वार्षिक हप्त्यांमध्ये विमाधारकास 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. टपाल खात्याच्या या अभिनव योजनेचा देशातील गरीब आणि मध्यमवर्गासाठी मोठा फायदा होत आहे. हा मोठा वर्ग आतापर्यंत स्वस्तातील विमा योजनेच्या प्रतीक्षेत होता. या विमा योजनेला टपाल खात्याची विश्वासार्हता उपयोगी पडणार आहे. वर्षभरात या योजनेचे विमा संरक्षण विमाधारकाला प्राप्त होईल. ही योजना 18 ते 65 वयांतील व्यक्तींसाठी आहे. या योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होण्यासाठी प्रत्येक टपाल कार्यालयांतर्गत व्यापक प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी टपाल खाते आणि टाटा एआयजी विमा कंपनीत सामंजस्य करार करण्यात आला आहे. ही योजना प्रत्येक टपाल कार्यालयातंर्गत अटी व शर्तींसह तुम्हाला विमा संरक्षण देईल.
यामध्ये विमाधारकाचा अपघाती मृत्यू, अपंगत्व किंवा कायमचे अंशिक अपंगत्व असल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाईल. याशिवाय या विम्यामध्ये रुग्णालयात दाखल झाल्यास 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरी उपचार घेतल्यास 30 हजार रुपयांपर्यंतचा दावाही दाखल करता येईल. त्याचबरोबर रुग्णालयाच्या खर्चासाठी 10 दिवस तुम्हाला प्रति दिन एक हजार रुपयेदेखील मिळतील. कुटुंबाला वाहतुकीसाठी 25 हजार रुपयांपर्यंतचा खर्चदेखील मिळणार आहे. कोणत्याही कारणाने अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी 5 हजार रुपये व या विम्यांतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येणार आहे.
टपाल खात्याची ही योजना 1 जूनपासून लागू केल्यानंतर मध्यमवर्गीयाकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. कोणती व्यक्ती विमा घेण्यास पात्र आहे, कोणती नाही याची सविस्तर माहिती टपाल खात्याने जाहीर केली आहे. त्यामुळे पात्र विमाधारक अल्प किमतीतील पॉलिसी घेण्याला प्राधान्य देत आहेत.
विभाग विमाधारक एकूण विमा रक्कम
गडहिंग्लज 4546 17 लाख 99 हजार 654
गारगोटी 3502 13 लाख 91 हजार 798
इचलकरंजी 4054 16 लाख 15 हजार 646
कागल 5492 21 लाख 87 हजार 708
कोल्हापूर द. 4374 17 लाख 40 हजार 126
कोल्हापूर प. 5364 21 लाख 33 हजार 536