कोल्हापूर : बारा हजार उमेदवारांना नोकरीची नियुक्‍तीपत्रे | पुढारी

कोल्हापूर : बारा हजार उमेदवारांना नोकरीची नियुक्‍तीपत्रे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  विवेकानंद संस्थेच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनमध्ये आयोजित भीमा मेगा जॉब फेअरला उदंड प्रतिसाद मिळाला. 30 हजारांहून अधिक उमेदवारांनी भेट दिली. देश-विदेशातील सुमारे 260 नामवंत कंपन्या या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यापैकी 12 हजार 300 जणांना जागेवरच नियुक्‍तीपत्रे देण्यात आल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांना दिली.

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सकाळी जॉब फेअरचे उद्घाटन झाले. संस्थेच्या आवारात उमेदवारांची नोंदणी, अर्ज भरून घेणे, संबंधित कंपनीकडून मुलाखती घेण्यात येत होत्या. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बेळगाव, गोवा येथील उमेदवारांनी मेळाव्याला उपस्थिती लावली होती.
उद्घाटनावेळी खा. महाडिक म्हणाले, मोठ मोठे उद्योग, व्यवसाय, कंपन्या, कारखाने यांच्याकडे प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव दिसतो. कोरोनामुळे अनेकांच्या नोकर्‍या, रोजगार गेलेला आहे. बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे. अशावेळी भीमा जॉब फेअरच्या माध्यमातून गरजूंना नोकर्‍या देण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. प्रा. साळुंखे म्हणाले, आज पदवी घेऊन बाहेर पडलेल्या अनेक बेरोजगार विद्यार्थ्यांना या भीमा जॉब फेअरमुळे नोकरीची संधी प्राप्त होत असल्याचा आनंद आहे.

संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांनी स्वागत केले. मुख्य संयोजक विश्‍वराज महाडिक, पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांनी मनोगत व्यक्‍त केले. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, सत्यजित कदम, भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, गोशिमाचे मोहन पंडितराव, शिरोली इंडस्ट्रीजचे दीपक पाटील, रघुनाथ गायकवाड, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, एमआयडीसीचे धैर्यशील देसाई आदी उपस्थित होते.

Back to top button