कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी नेत्यांची फिल्डिंग; बेरजेच्या राजकारणावर भर | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी नेत्यांची फिल्डिंग; बेरजेच्या राजकारणावर भर

कोल्हापूर : संतोष पाटील

कोल्हापूर जिल्हा बँकेत सहज आणि सुकर प्रवेश व्हावा, यासाठी मातब्बर नेतेमंडळी रणनीती आखत आहेत. जिल्हा बँकेनंतर राजाराम कारखान्यासह पाच अन्य साखर कारखाने, महापालिका, बाजार समिती, 29 औद्यागिक संस्था, 13 प्रक्रिया संस्था, 12 खरेदी-विक्री संघ असा निवडणुकांचा एकापाठोपाठ एक असा धुव्वा उडणार आहे. ‘गोकुळ’ निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय संदर्भांनंतर जिल्हा बँकेतील अस्तित्व कायम ठेवण्यासह आपल्या संस्था ताब्यात ठेवण्यासाठी नेत्यांनी सावध भूमिका घेत मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

महाविकास आघाडीचा प्रयोग?

‘गोकुळ’प्रमाणेच महाविकास आघाडीच्या प्रयोगातून जिल्हा बँक ताब्यात ठेवण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व्यूहरचना आखत आहेत. बँक निवडणुकीच्या निमित्ताने पडद्यामागील हालचाली गतिमान झाल्या आहेत. आ. पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदी संधी देऊन पालकमंत्री सतेज पाटील आणि मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेसाठी पहिला डाव यशस्वी टाकल्याचे समजले जात आहे.

गोकुळच्या राजकारणात एकत्र असलेले आ. पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक संस्था निवडणुकांत पुन्हा एकत्र येऊ नयेत, यासाठी दोन्ही मंत्र्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील, खा. संजय मंडलिक याची राजकीय दोस्ती असली तरी खा. मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांच्या गोकुळमधील पराभवाचे पडसाद काही प्रमाणात उमटण्याची शक्यता आहे. शिवसनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांचे गोकुळमधील शासननियुक्त संचालकपद रोखल्याने शिवसेनेतील गटबाजीला आणखी धार आली आहे.

पडसाद साखर कारखान्यांच्या निवडणुकीत उमटणार

जिल्ह्यातील यापुढील निवडणुकांत महाडिक गटासोबत भाजपची ताकद असणार आहे. गोकुळप्रमाणेच जिल्हा बँकेत जनसुराज्य पक्षाचे आ. विनय कोरे हे सत्ताधारी गटासोबत राहतील, असे दिसते. राजाराम कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा सतेज पाटील आणि महाडिक गटात टोकाचा संघर्ष होण्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत. शरद, तात्यासाहेब कोरे-वारणा, डॉ. डी. वाय. पाटील व दत्त असुर्ले-पोर्ले या साखर कारखान्यांच्या निवडणुकांत गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या राजकारणाचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.

राजकारण ढवळून निघणार

गोकुळच्या निमित्ताने केलेली मोर्चेबांधणी इतरही संस्थांच्या निवडणुकांत कायम ठेवण्याचे कठीण काम दोन्ही मंत्र्यांपुढे आहे. जिल्हा बँकेप्रमाणेच बाजार समितीच्या राजकारणात आ. पी. एन. पाटील यांची साथ दोन्ही काँग्रेसना ताकद देणारी ठरेल. नवनव्या राजकीय समीकरणांत जिल्हा बँक, महापालिका, साखर कारखाने, बँका आदी एकापाठोपाठ एक असा निवडणुकींचा धुव्वा उडणार आहे. प्रत्येक संस्थेत परिघाबाहेरील होणार्‍या जोडण्यांमुळे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघेल हे मात्र निश्चित.

राजकीय दिशा होणार स्पष्ट

जिल्हा बँकेसाठी राधानगरी भुदरगड, करवीर, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, कागल, चंदगड या तालुक्यातील नेत्यांचा पाठींबा मिळावा, यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा बँक आणि त्यानंतरच्या राजाराम कारखान्याच्या निवडणुकांचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट करणारा ठरेल. गोकुळ आणि जिल्हापरिषद राजकारणामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांचा जिल्हा बँकेतील प्रवेश सुकर होण्याची शक्यता आहे.

मातब्बर संचालक

जिल्हा बँकेच्या 21 संचालकांत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खा. संजय मंडलिक, आ. पी. एन. पाटील, आ. विनय कोरे, माजी आमदार महादेवराव महाडिक, आ. राजू आवळे, आ. राजेश पाटील, माजी खासदार निवेदिता माने आदी मातब्बर विद्यमान संचालकांसह पालकमंत्री सतेज पाटील पुन्हा बँकेत येण्याची जय्यत तयारी करत आहेत.

प्रारूप मतदार यादी उद्या होणार जाहीर

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रारूप मतदार यादी शुक्रवारी (दि.3) प्रसिद्ध होणार आहे. विभागीय सहकार उपनिबंधक कार्यालय आणि जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात सकाळी 11 पासून मतदार यादी सर्वांना पाहता येईल, अशी माहिती विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था अरुण काकडे यांनी दिली.

जिल्हा बँकेने प्राप्त 8 हजार 571 ठरावांची छाननी करून अपात्र 973 संस्थांची नावे वगळली आहेत. सहकार विभागाने संस्थांची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी दहा दिवसांची मुदत आहे. यानंतर 13 सप्टेंबरपासून हरकती स्वीकारल्या जातील. 22 सप्टेंबरला हकरती आणि दावे यावरील सुनावणीचा अंतिम निर्णय होऊन 27 सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Back to top button