चंद्रकांत पाटील यांनी हद्दवाढीसाठी पुढाकार घ्यावा : आ. सतेज पाटील | पुढारी

चंद्रकांत पाटील यांनी हद्दवाढीसाठी पुढाकार घ्यावा : आ. सतेज पाटील

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यातून निवडून आले असले तरी ते मूळचे कोल्हापूरचे आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून त्यांच्यावरच जबाबदारी येण्याची शक्यता आहे. ते भावी पालकमंत्री असून कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी त्यांनीच पुढाकार घ्यावा. समर्थक व विरोधक अशा दोन्ही बाजूंची एकत्रित बैठक बोलावून चर्चा करावी. त्यातून तोडगा निघेल, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हद्दवाढीच्या प्रश्‍नावर सर्व पक्षांनी एकाच व्यासपीठावर येऊन आपापली भूमिका स्पष्ट करावी. कोल्हापूर शहरात एक आणि ग्रामीण भागात गेल्यावर दुसरीच भूमिका असे होऊ नये. हद्दवाढीच्या प्रश्‍नावर चंद्रकांत पाटील यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. राज्य शासन आणि पाटील यांनी शहरी आणि ग्रामीण जनतेशी संवाद साधावा. प्रत्येक घटकाबरोबर बोलून विश्‍वासाने निर्णय घ्यावा. चर्चेतून समोपचाराने मार्ग काढावा, असेही सतेज पाटील म्हणाले. यावेळी आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव उपस्थित होते.

Back to top button