कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या राजकारणात ‘टँकर’ पुन्हा चर्चेत | पुढारी

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या राजकारणात ‘टँकर’ पुन्हा चर्चेत

कोल्हापूर ; विकास कांबळे : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघामध्ये (गोकुळ) टँकरची चर्चा सतत सुरू असते. ‘गोकुळ’चा विषय निघेल तेव्हा महादेवराव महाडिक यांच्या टँकरचा विषय विरोधक काढत होते. सत्तांतरानंतर तरी टँकरचा विषय थांबेल, अशी अपेक्षा होती. परंतु, वर्षभरात तसे काही घडले नाही. अजूनही हा विषय सत्ताधार्‍यांकडून लावून धरण्यात येत असल्यामुळे आता विरोधकांनीही सत्ताधार्‍यांनी ‘गोकुळ’मध्ये घेतलेल्या एका मेव्हण्याच्या टँकरचा मुद्दा उपस्थित करत लक्ष वेधले आहे. त्यामुळे हा लाडका मेव्हणा कोणाचा? याची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

‘गोकुळ’मध्ये दूध उत्पादकांना देण्यात येणारी रक्‍कम वगळता सर्वाधिक खर्च कर्मचार्‍यांच्या पगारावर होतो. त्यानंतर वाहतूक विभागावर खर्च होत असतो. रोज साधारणपणे 13 लाख लिटर दुधाची आवक व वितरण होते. याच्या वाहतुकीसाठी वर्षाला सुमारे 100 ते 110 कोटी रुपये खर्च होत असतो. दुधाची वाहतूक टँकरमार्फत केली जाते. तर ग्रामीण भागातून दुधाचे कॅन आणण्यासाठी टेम्पोंचा वापर केला जातो. याशिवाय पशुखाद्याची वाहतूक करण्यासाठी लागणारी वाहने वेगळी. संचालकांना ‘अभ्यास दौर्‍या’साठी जाण्याकरिता किंवा ‘गोकुळ’च्या महत्त्वाच्या कामांना जाण्यासाठी भाड्याने घेण्यात येणारी वाहने वेगळी. असे असले तरी ‘गोकुळ’मध्ये चर्चा होती ती केवळ
टँकरची.

सत्तांतर झाल्यानंतर टँकरचा विषय संपेल, असे वाटत होते; परंतु एक वर्ष झाले तरी टँकरचा विषय सत्ताधारी सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता विरोधकांनीच टँकरचा मुद्दा उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. सभेच्या निमित्ताने संचालिका शौमिका महाडिक यांनी आम्ही सभासदांच्या हिताचे प्रश्‍न सभेमध्ये विचारण्यासाठी आलो होतो. तुम्ही कोणाच्या मेव्हण्याला टँकर दिला, कोणाची वाहने कोणत्या संस्थेच्या नावाने भाड्याने घेतली, हे विचारण्यासाठी आलो नव्हतो, असे सांगून सत्ता येताच टँकरमध्ये चाललेल्या ‘व्यवहारा’कडे अंगुलीनिर्देश केला आहे. त्यामुळे यापुढेही टँकरचा विषय गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता मात्र विरोधक यात आघाडीवर असणार आहेत.

Back to top button