‘हातकणंगले’ विभाजनावरून संघर्षाची ठिणगी | पुढारी

‘हातकणंगले’ विभाजनावरून संघर्षाची ठिणगी

हातकणंगले ; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शाहू महाराजांनी मोठ्या दूरद‍ृष्टीने स्थापन केलेल्या हातकणंगले तालुक्याचे तुकडे करण्याचा घाट घातलेल्या काही लोकप्रतिनिधींच्या निषेधाच्या घोषणा देत आणि स्वार्थी राजकीय व्यक्‍तींचे मनसुबे कदापि सफल होऊ देणार नाही, असा पवित्रा हातकणंगले तालुका विभाजनविरोधी कृती समितीच्या वतीने घेत संपूर्ण गाव बंद ठेवून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार कल्पना ढवळे यांना निवेदन दिले.

सोमवारी सकाळी 11 वाजता दर्गा चौक येथून नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. घोषणा देत मोर्चा बसस्थानकासमोर आला. त्या ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. यावेळी नगराध्यक्ष जानवेकर, उपनगराध्यक्ष केतन कांबळे, नगरसेवक राजू इंगवले, मयुर कोळी, सागर पुजारी, प्राजक्‍ता उपाध्येे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माजी सरपंच अजित पाटील व नूर मुजावर, बापू ठोंबरे, शकील अत्तार, बी. एल. शिंगे, रमेश शिंदे, संदीप कारंडे यांनी तीव्र भावना व्यक्‍त केल्या. त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर निवेदन देण्यात आले.

आ. प्रकाश आवाडे यांचा निषेध

हातकणंगले तालुक्याचे विभाजन करण्यासाठी आ. आवाडे यांनी पुढाकार घेतल्याचा आरोप करीत मान्यवरांनी त्यांचा निषेध नोंदवला. तसेच त्यांना भूमिका न बदलल्यास हातकणंगलेत पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही दिला.

इचलकरंजी तालुका झालाच पाहिजे

रूकडी : पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी तालुका झालाच पाहिजे, अशी भूमिका घेत परिसरातील 20 गावांतील सरपंच व प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यापक लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. यासाठी साजणीचे ग्रा.पं. सदस्य शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती स्थापन केली आहे. याबाबत प्रांताधिकारी डॉ. खरात यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, इचलकरंजी परिसरात तीन महसुली सर्कल असून, त्यामध्ये चंदूर, कोरोची, शहापूर, तारदाळ, खोतवाडी, रूई, इंगळी, पट्टणकोडोली, साजणी, तिळवणी, माणगाव, माणगाववाडी, हुपरी, यळगूड, रेंदाळ, रांगोळी, जंगमवाडी आणि तळंदगे या गावांचा समावेश आहे. लोकसंख्या वाढ, औद्योगिकीकरण व शहरीकरणामुळे हातकणंगले तालुक्याची लोकसंख्या वाढत गेली. महसूल यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे परिसरातील 20 गावांसाठी वेगळा तालुका व्हावा, ही सातत्याने मागणी होत आहे. मात्र, राजकीय अनास्थेमुळे विषय हाताळला गेला नाही. आ. प्रकाश आवाडे यांनी घेतलेली भूमिका योग्यच असून, आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी आहेत. प्रसंगी रस्त्यावरची लढाई करावी लागली, तरी मागे हटणार नाही.

Back to top button