कोल्हापूर : गोकुळच्या सभेत विरोधक आक्रमक; शौमिका महाडिकांचा स्टेजवर जाण्यास नकार | पुढारी

कोल्हापूर : गोकुळच्या सभेत विरोधक आक्रमक; शौमिका महाडिकांचा स्टेजवर जाण्यास नकार

पुढारी ऑनलाईन डेस्क : गोकुळमधील सत्तातरांनंतर आज पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाली आहे. विरोधक बसण्यासाठी खुर्च्या नसल्याने सुरूवातीपासूनच आक्रमक झाले आहेत. महाडिक – पाटील गटाच्या सभासदांनी प्रचंड घोषणाबाजी केल्याने गोंधळ निर्माण झाला. दरम्यान विरोधी सभासदांना बसण्यासाठी जागा नसल्याने संचालिका शौमिका महाडिक यांनी स्टेजवर जाण्यास नकार दिला.

या सभेला माजी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील उपस्थित आहेत. विरोधी सभासद येण्याआधी सभागृह कसे भरले, असा सवाल संचालिका शौमिका महाडिक यांनी केला आहे. तसेच प्रश्नाांची उत्तरे दिल्याशिवाय सभा सुरू होऊ देणार नाही,असा पवित्रा महाडिक यांनी घेतल्याने सभेत प्रचंड गोंधळ र्निमाण झाला.

गोकुळच्या कारभारावरून गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, विरोधकांनी समांतर सभा घेण्याचा दिलेला इशारा, सभा चालविण्याचा सत्ताधार्‍यांनी केलेला निश्चय यामुळे गोकुळची 60 वी सर्वसाधारण सभा वादळी ठरत आहे. सभामगृहात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. विरोधी गटाचे सभासद येण्यापूर्वीच हॉल भरल्याने त्यांना शेवटच्या रांगेत बसावे लागले. शौमिका महाडिक ठरावधारकांसह हॉलमध्ये पोहोचताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विरोधी सभासदांनी प्रश्न कसे विचारायचे? त्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या. विरोधी सभासद येण्याआधीच सभागृह कसे भरले? असा सवाल महाडिक यांनी उपस्थीत केला.

कडेकोट बंदोबस्त

गोकुळच्या सैनिक दरबार हॉलमध्ये सुरू असलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभास्थळासह परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या सभेसाठी 2 पोलिस उपअधीक्षक, 5 पोलिस निरीक्षक, 12 सहायक निरीक्षक, 71 पोलिस अंमलदार, 22 महिला पोलिस, वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक शाखेचे 15 पोलिस, आरसीपी, स्ट्रायकिंग फोर्स असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

Back to top button