कोल्हापूर : ‘क्रॉसिंग स्टेशन’ची घोषणा हवेतच | पुढारी

कोल्हापूर : ‘क्रॉसिंग स्टेशन’ची घोषणा हवेतच

कोल्हापूर; अनिल देशमुख : कोल्हापूर-मिरज मार्गावर धावणार्‍या रेल्वेचा धूर सध्या जसा हवेत विरत जातो, तसेच कोल्हापूरसाठी दिलेली आश्‍वासनेही हवेत विरत जातात की काय, अशीच स्थिती आहे. कोल्हापूर-मिरज मार्गावर दोन ठिकाणी क्रॉसिंग स्टेशन उभारण्याची घोषणा झाली होती. मात्र, तीही हवेतच गेली की काय, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. या मार्गाच्या दुहेरीकरणाला तात्पुरता पर्याय म्हणून ही संकल्पना पुढे आली होती. आता कोल्हापूर-मिरज मार्गाच्या दुहेरीकरणासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे, अन्यथा कोल्हापूर-मिरज मार्ग पुन्हा मागे राहण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर-मिरज मार्गावर दररोज 18 रेल्वे ये-जा करत असतात. याखेरीज आठवड्यातून दोनवेळा धावणारी एक, तर एकदा धावणार्‍या तीन गाड्या आहेत. यापैकी तीन गाड्यांचे रुकडी येथे, तर एका गाडीचे जयसिंगपूर येथे क्रॉसिंग करावे लागत आहे. या क्रॉसिंगचा सर्वात मोठा फटका या मार्गावर नोकरी, व्यवसाय, शिक्षण आदी कारणासाठी दररोज जे-जा करणार्‍या हजारो प्रवाशांना बसत आहे.

सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी कोल्हापुरात पोहोचणारी सातारा-कोल्हापूर पँसेजर गाडी दररोज उशिराने पोहोचत आहे. मुळात शासकीय कार्यालयाची सकाळी उपस्थित राहण्याची वेळ पावणे दहा अशी केली आहे. यामुळे ही गाडी साडे नऊ वाजेपर्यंत पोहोचेल, या द‍ृष्टीने त्याची वेळ बदला अशी गेल्या काही महिन्यांपासून मागणी आहे. ती पूर्ण करणे राहिले दूर; पण सध्या धावणारी ही गाडीही सकाळी 10 पूर्वी येतच नाही. ही गाडी जयसिंगपूरमध्ये कोल्हापुरातून मुंबईला जाणार्‍या कोयना एक्स्प्रेसच्या क्रॉसिंगसाठी थांबवून ठेवली जाते. सायंकाळी 6.40 वाजता सुटणार्‍या कोल्हापूर-सांगली या पँसेजरचीही परिस्थिती अशीच आहे. ही गाडीही पुणे-कोल्हापूर पँसेजरच्या क्रॉसिंगसाठी रुकडीत थांबवली जाते. मात्र, वेळापत्रक जरा बिघडले की मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेससाठी ही गाडी पुढे कुठे तरी थांबतेच. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो.

काय होते क्रॉसिंग स्टेशनवर?

क्रॉसिंगसाठी होणार्‍या विलंबाने रेल्वे वेळापत्रकावर परिणाम होतोच शिवाय प्रवाशांनाही त्याचा फटका बसतो. यामुळे तत्कालीन पुणे विभागाचे व्यवस्थापक देऊसकर यांनी कोल्हापुरात दौर्‍यात रुकडी ते हातकणंगले आणि हातकणंगले ते जयसिंगपूर यादरम्यान दोन क्रॉसिंग स्टेशन उभारण्याची घोषणा केली होती. क्रॉसिंग स्टेशनमध्ये ज्या ज्या ठिकाणी रेल्वेची योग्य जागा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी रेल्वे मार्गाला काही अंतर समांतर मार्ग (काही अंतराचे दुहेरीकरण) उभा केला जाणार होता. त्यानुसार या दोन्ही स्थानकांदरम्यान प्रत्येकी तीन ते पाच किलोमीटर लांबीचे दोन समांतर मार्ग तयार करण्याचे नियोजन होते. यामुळे सुमारे दहा किलोमीटर का होईना दुहेरीकरण होणार होते.

का हवे दुहेरीकरण

पुणे-मिरज-लोंढा या मार्गाचे दुहेरीकरण सुरू आहे. मार्च 2024 पर्यंत ते पूर्ण होईल. यामुळे या मार्गावरील वाहतूक वाढणार आहे. मात्र, मिरज ते कोल्हापूर हा सर्वाधिक मागणी असणारा, वाहतुकीची क्षमता असणारा 48 किलोमीटर लांबीचा मार्ग मात्र एकेरीच राहणार आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीला मर्यादा येणार आहेत. त्यामुळे नव्या गाड्या, लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यास मोठा अडथळा ठरणार आहे. त्याचा मोठा फटका कोल्हापूर आणि पर्यायाने जिल्ह्याच्या विकासाला बसणार आहे. यामुळे कोल्हापूर-मिरज या मार्गाचेही दुहेरीकरण होणे आवश्यक आहे.

Back to top button