‘गोकुळ’मधील संघर्षाला पुन्हा धार | पुढारी

‘गोकुळ’मधील संघर्षाला पुन्हा धार

कोल्हापूर; विकास कांबळे : जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळमधील कारभारावर पूर्वीच्या विरोधकांनी आणि सध्याच्या सत्ताधार्‍यांनी अक्षरश: रान उठवले होते. गोकुळमधील टँकर, वासाचे दूध, पॅकिंगवर होणारा खर्च तसेच अन्य कामांवर होणारी उधळपट्टी या मुद्द्यांवर आ. सतेज पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी पाच वर्षे सतत गोकुळवर टीकेची झोड उठविली होती. आता ते सत्तेत आहेत आणि पूर्वीचे सत्ताधारी विरोधक झाले आहेत.

विरोधी आघाडीचे चार संचालक निवडून आले असले तरी महिला गटातून संचालक झालेल्या शौमिका महाडिक या एकट्याच गोकुळच्या कारभारावर आक्रमकपणे लढताना दिसत आहेत. त्यातच धनंजय महाडिक खासदार झाल्यानंतर तेही आता गोकुळच्या लढाईत सक्रिय झाल्यामुळे गोकुळमधील संघर्षाला पुन्हा धार आली आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात महादेवराव महाडिक यांच्यापासून आ. सतेज पाटील यांनी फारकत घेतल्यानंतर दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला. आ. पाटील यांनी महाडिक यांना चारी बाजूने घेरत त्यांचे एक एक सत्ताकेंद्र ताब्यात घेण्यास सुरुवात केली. अपवाद फक्त गोकुळचा होता. गेल्या निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र पॅनेल उभा केले होते, पण यश आले नव्हते. तरीदेखील त्यांनी गोकुळचा पिच्छा सोडला नाही. पाच वर्षे सतत गोकुळच्या कारभारावर सर्व पक्षीयांची मोट बांधत, आवाज उठवत गोकुळचा कारभार चर्चेत ठेवला. त्यामुळे सन 2021 च्या गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी आ. पाटील व आ. हसन मुश्रीफ यांच्यावर विश्वास ठेवत दूध संघ त्यांच्या ताब्यात दिला.

सध्याचे सत्ताधारी विरोधात असताना ज्या मागण्या करत होते त्याच मागण्या आता पूर्वीचे सत्ताधारी व सध्याचे विरोधक करू लागले आहेत. टँकरच्या बाबतीत विरोधात असताना आ. पाटील यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सत्ता आल्यानंतर त्यांनी टँकरवर काम सुरू केले. त्यासाठी नियमात बदल केले. पण, त्यानंतर जे टँकर घेण्यात आले ते कोणत्या नियमांच्या आधारे घेण्यात आले? कोणाचे घेण्यात आले? यात नेत्यांच्या जवळच्यांचे टँकर किती? याचा खुलासा विरोधक मागत आहेत. आ. पाटील यांनी विक्री दरात वाढ न करता दूध उत्पादक शेतकर्‍याला 4 रुपये प्रति लिटर दूध दरवाढ देता येते, असे सांगितले होते. दूध उत्पादकाला दिलेली वाढ आणि विक्री दरातील वाढीची रक्कम यात त्यांना फरक ठेवता आला नसल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे.

सत्तेवर आल्यानंतर पॅकिंगचा ठेका बदलला; परंतु हा ठेका बदलल्यानंतर गोकुळला दिवसाला साडेपाच लाखांचा तोटा होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे; परंतु यात तथ्य नसल्याचे सत्ताधार्‍यांचे म्हणणे आहे. आ. पाटील यांनी विरोधात असताना दुधाच्या वासाचा मुद्दा चांगलाच वाजविला होता. काही संस्थांचे दूध वासाचे असले तरी घेतले जाते. ते बंद झाले पाहिजे, अशी मागणी करत होते; परंतु हे दूध परत पाठविणे किती अवघड आहे, हे गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी पत्रक काढून स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या वासाच्या दुधाचा मुद्दा निकालात काढणार की ‘ये रे माझ्या मागल्या’ या म्हणीप्रमाणे कारभार सुरू ठेवणार, हा खरा प्रश्न आहे.

गोकुळच्या अहवालावरून दरवर्षी दूध संकलनात वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात सरासरी तेवढीच वाढ दूध संकलनात दिसत आहे. गोकुळ बाहेरच्या खासगी लोकांकडून दूध घेते त्याची गुणवत्ता तपासली जात नाही, असा एक आक्षेप सध्याचे सत्ताधारी पूर्वी विरोधात असताना घेत होते. आता हाच प्रश्न विरोधक सत्ताधार्‍यांना विचारत आहेत. तेव्हा देखील छापील उत्तर दिले जात होते आणि आतादेखील त्यात फारसा फरक पडलेला दिसत नसल्याचे पाहावयास मिळते. एकंदरीत विरोधकांचे प्रश्न आणि सत्ताधार्‍यांची उत्तर यामध्ये सत्तांतरानंतरही फारसा फरक पडलेला दिसत नाही, असेच चित्र आहे.

पूर्वी शौमिका महाडिक सत्ताधार्‍यांना प्रश्न विचारत होत्या. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शांत असलेले धनंजय महाडिक खासदार झाल्यानंतर पुन्हा सक्रिय व आक्रमक झाले आहेत. त्यांनीदेखील गोकुळचा कारभार सुधारण्यासाठी सत्ताधार्‍यांवर तोफ डागण्यास सुरुवात केली आहे. यापुढे गोकुळमध्ये जे घडेल त्यावर बोट ठेवण्याचा प्रयत्न महाडिक यांच्याकडून होणार असल्यामुळे गोकुळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Back to top button