पत्रकबाजीतून सवंग प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करू नये; गोकुळ चेअरमन विश्‍वास पाटील यांचा शौमिका महाडिक यांच्यावर पलटवार | पुढारी

पत्रकबाजीतून सवंग प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करू नये; गोकुळ चेअरमन विश्‍वास पाटील यांचा शौमिका महाडिक यांच्यावर पलटवार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : सवंग लोकप्रियेतेसाठी पत्रकबाजी करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणार्‍या शौमिका महाडिक यांनी सभासदांची दिशाभूल करू नये. राजकीय द्वेषातून व्यक्‍तिगत आरोप केल्यास आम्हालाही त्याच पद्धतीने आरोप करावे लागतील, असा पलटवार गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी केला.

दूध उत्पादक शेतकर्‍यांशी आमची बांधिलकी असल्याने त्यांच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे गोकुळच्या सभेत देण्याची आमची तयारी आहे. प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न आम्ही कधीच केला नाही, असेही पाटील म्हणाले.

विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या टिकेला उत्तर देताना चेअरमन पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकरी गोकुळचे मालक आहेत. त्यामुळे सोमवारी होणार्‍या वार्षिक सभेत त्यांचे समाधान होईपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील. त्यांचे समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सभा चालू ठेवण्यात येईल. ‘गोकुळचा विकास आणि विस्तार, दूध उत्पादकांचे हित हेच सूत्र आहे.’ म्हैस दूध खरेदी दरात सहा, तर गाय दूध खरेदी दरात पाच रुपयांनी वाढ करून निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची आम्ही पूर्तता केली आहे.

गेली चाळीस वर्षे दूध उत्पादकांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे चेअरमनांचा अभ्यास आहे की नाही, हे दूध उत्पादकांना माहीत आहे. संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये दूध उत्पादक हिताचे कोणतेही विषय न मांडणार्‍या संचालिका महाडिक यांनी त्यांना मान्य नसणार्‍या प्रश्नाला कधीही विरोध केलेला नाही. त्यामुळे त्यांनी आपलेच प्रश्न अभ्यासपूर्वक आहेत का ते तुम्ही तपासून पाहावे, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

Back to top button